रेशीम उत्पादन केंद्रांना मिळणार चालना ; पुरंदर तालुक्यातील 14 गावांत होणार तुती लागवड | पुढारी

रेशीम उत्पादन केंद्रांना मिळणार चालना ; पुरंदर तालुक्यातील 14 गावांत होणार तुती लागवड

सासवड : पुढारी वृत्तसेवा :  सासवड- जेजुरी रस्त्यालगत पाच एकर क्षेत्रावर रेशीम उत्पादन केले जात होते. काळाच्या ओघात उत्पादन बंद झाल्यानंतर संपूर्ण इमारतच धूळ खात पडली आहे. सन 2004 पासून केंद्रात कोणत्याही प्रकारचे उत्पादन केलेले नाही; मात्र, आता या रेशीम केंद्राला पुन्हा एकदा झळाळी मिळणार आहे. रेशीम (तुती) उत्पादन सुरू करण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मदतीचा हात पुढे केला असून हेक्टरी 4.25 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचबरोबर तालुक्यातील 14 गावांमध्ये तुतीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येणार आहे.

रेशीम उत्पादन केंद्र सध्या खादी ग्रामोद्योग यांच्या नावावर असून वस्त्रोद्योग विभागाच्या नावावर होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, याचा शासन निर्णय झाला असून लवकरच वस्त्रोद्योग विभागाच्या नावावर होईल. यानंतर या केंद्राला खर्‍या अर्थाने चालना मिळणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून शेतकर्‍यांना बेणे पुरविणे, अंडीपुंज पुरवठा, शेतकर्‍यांना प्रशिक्षण, शेतकरी अभ्यासदौरा, शेती उद्योग प्रचार व प्रसार, तुती रोपे खरेदी, शासकीय रिलिंग व फार्म देखभाल, शासकीय अंडीपुंज निर्मिती केंद्रअंतर्गत खर्च अशा विविध योजना राज्य सरकारच्या माध्यमातून राबविता येणार आहेत.

पुरंदर तालुक्यातील 14 गावांमध्ये सुमारे 140 एकर क्षेत्रावर तुतीची लागवड केली जाणार असून जिल्हा बँकेच्या वतीने हेक्टरी सव्वाचार लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना राबविणे व रेशीम कीटक संगोपन गृह बांधकाम या दोन्ही योजना संयुक्तपणे राबविणे यामुळे शक्य होणार आहे. यातून तुती लागवड जोपासना, नर्सरी, कोश काढणे तसेच कीटक संगोपन गृह बांधकाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जमाती, दारिर्द्य रेषेखालील कुटुंबे, महिलाप्रधान कुटुंबे, शारीरिक अपंग असलेली कुटुंबे, भूसुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास लाभार्थी अशा विविध घटकांना रेशीम उत्पादन केंद्र चालविणे शक्य होणार आहे.

पुरंदरची कापड निर्मितीमध्ये नोंद करण्यासाठी प्रयत्न
पुरंदर तालुक्याची अनेक दृष्टीने वेगळी ओळख आहे. कृषी उत्पादनामध्ये पुरंदरचे नाव जगात पोहोचले आहे. अंजीर, पेरू, डाळिंब, वाटाणा या पिकांबरोबरच इतर पिकांचे उत्पादन वाढले पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सासवडजवळ असलेल्या रेशीम केंद्रात तुती लागवड करून रेशीम केंद्राला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्यात येईल. तालुक्यातील 14 गावांमध्ये तुतीचे उत्पादन घेण्यात येणार असून रेशीम उद्योगाचा मोठा विस्तार होईल. या माध्यमातून तालुक्यात सुती साडी किंवा सुती धोतर याची निर्मिती करून पुरंदरची कापड निर्मितीमध्ये नोंद करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्यात येणार आहेत.

Back to top button