पुणे जिल्ह्यात शेतकर्‍यांचं आता टोमॅटोकडे लक्ष ; मांडव उभारणीला वेग | पुढारी

पुणे जिल्ह्यात शेतकर्‍यांचं आता टोमॅटोकडे लक्ष ; मांडव उभारणीला वेग

ओतूर : पुढारी वृत्तसेवा  : उत्तर पुणे जिल्ह्यातील माळशेज पट्ट्यातील बहुतांश गावात शेतकरी कांदा पीक काढून घेतल्यानंतर टोमॅटो हे रब्बी पीक घेतात. यंदाही कांदा पिकाला बाजारभाव मिळालेले नसल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी टोमॅटो लागवडीकडे जास्तीचे लक्ष दिले आहे. टोमॅटो पिकाला भक्कम भांडवली खर्च येतो. यंदा बाजारभावाअभावी शेतकर्‍यांनी कांदा साठवणुकीकडे भर दिला आहे. आता टोमॅटोतून तरी नशीब उघडेल या हेतूने मोठ्या भांडवलाचा विचार न करता टोमॅटो पीक घेण्याचे शेतकर्‍यांनी ठरविले आहे. टोमॅटो पिकासाठी शेतीची मशागत करताना बेड, रोप, मल्चिंग पेपर, ठिबक पाईप, औषधे, खते, कारवी, डांब, सुतळी, तंगुस, मजुरी अशा अनेक गोष्टीत रोख भांडवल गुंतवावे लागते. टोमॅटोला सरासरी एक एकरला दीड लाख रुपये इतका खर्च येतो. रोप लागवड केल्यानंतर 35 ते 40 दिवसांत टोमॅटो बाग बांधणीला येत असते. आता सर्वत्र मांडव बांधणीची लगबग दिसून येत आहे.

शेतकर्‍यांना बाजारभावाची अपेक्षा
राज्यातील प्रमुख टोमॅटो मार्केट नारायणगाव येथे टोमॅटोला 150 ते 250 रुपये प्रति कॅरेटला भाव मिळत आहे. मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च करूनही भविष्यात बाजारभाव मिळतील की नाही याची कोणतीही शाश्वती देता येत नाही. कांद्याने फसवले; परंतु टोमॅटो पीक तरी साथ देईल, अशी आशा शेतकर्‍यांना आहे.

भांडवली खर्चात लक्षणीय वाढ
टोमॅटो पिकासाठी 8 फूट डांब 25 ते 30 रुपयांना, तर कारवी 12 ते 18 रुपयेप्रमाणे घ्यावी लागत आहे. 1 एकर क्षेत्रासाठी 700 ते 800 कारवी आणि 200 ते 250 डांबची गरज असते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डांब व कारवीचे दरात मोठी वाढ झाली आहे. सद्य:स्थितीत तारेचे दर किलोला 100 ते 120 रुपये आहेत. सुतळीचे पोते 4 हजार ते 4500 रुपये आहेत.

Back to top button