आकुर्डी : संत ज्ञानेश्वर उद्यानाचा होणार कायापालट | पुढारी

आकुर्डी : संत ज्ञानेश्वर उद्यानाचा होणार कायापालट

आकुर्डी; पुढारी वृत्तसेवा : प्राधिकरणातील सर्वात मोठे 14 एकर जागेवर विस्तारलेल्या संत ज्ञानेश्वर उद्यानाचा कायापालट होणार आहे. या संदर्भात अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी उद्यानाची पाहणी केली. यादरम्यान त्यांनी उद्यान अधीक्षक व विभागीय अधिकार्‍यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. या वेळी अ प्रभाग उद्यान विभागाचे अभियंता, नागरी सुरक्षा समितीचे अध्यक्ष विजय पाटील, प्रसेन अष्टेकर, विजय मुनोत आदी उपस्थित होते. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सेक्टर 28 मधील संत ज्ञानेश्वर उद्यानास भेट देऊन पाहणी केली.

यादरम्यान त्यांनी उद्यान अधीक्षक व विभागीय अधिकार्‍यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. शहरातील या जुन्या उद्यानांची वस्तुस्थिती सुमार असल्यामुळे त्यांनी पाहणीदरम्यान नाराजी व्यक्त केली. जॉगिंग ट्रॅकच्या दुतर्फा झाडी लावणे, हिरवळ सुस्थितीत पुन्हा बनविणे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

…हे बदल करणार

  • नवीन उद्यानाचा आराखडा बनविणे
  • मुख्य पाण्याच्या टाकीची साफसफाई करून व्यवस्थित झाकणे
  • सावलीच्या ठिकाणी इनडोअर झाडे लावणे
  • पोयटा मातीचा वापर करून झाडे लावणे
  • जॉगिंग ट्रॅक अद्ययावत करणे
  • लॉन व्यवस्थित बनविणे
  • जॉगिंग ट्रॅकच्या दुतर्फा झाडे लावणे
  • उर्वरित म्युरलचे काम लवकर मार्गी लावणे.

पाहणीदरम्यान प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी सांगितले की, ‘गेल्या तीन वर्षांपासून समिती संत ज्ञानेश्वरांच्या म्युरल्स बनविण्यासाठी पाठपुरावा करीत आहे. सदरचे काम अपूर्ण स्थितीत असून ते तातडीने करण्यात यावे. नक्षत्र वाटिकेतील झाडांची पुन्हा लागवड करावी.’

तसेच उद्यानात पोयटा माती कमी असल्याने झाडांची वाढ होत नसल्याचेही स्पष्ट केले. तसेच निगडी येथील विहिरीच्या पंपिंग स्टेशनमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने तातडीने पाईप बदलण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

याबाबत अतिरीक्त आयुक्त जांभळे यांनी लवकरच उद्यानात मोठे बदल करणार असल्याचे सांगितले; तसेच उद्यानाबाबत आपल्या सूचनांची दखल घेतली जाईल, असे सांगितले. उद्यानात व्यायामासाठी दररोज शेकडो नागरिक येत असतात. जॉगिंग व चालण्यासाठी आदी गोष्टींसाठी उद्यानाचा कायापालट होणे गरजेचे आहे.

Back to top button