ग्रामपंचायतींनी केली साडेतीनशे कोटींची वसुली | पुढारी

ग्रामपंचायतींनी केली साडेतीनशे कोटींची वसुली

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात ग्रामपंचायतींनी यावर्षी 357 कोटी 76 लाख रुपयांची घरपट्टी आणि पाणीपट्टी करवसुली केली. करवसुलीसाठी विशेष शिबिरे घेतली. मात्र, उद्दिष्ट पूर्ण होऊ शकलेले नाही. 424 कोटी 79 लाख रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट होते. ग्रामपंचायतींना 84 टक्के वसुली करता आली आहे. बारामती, इंदापूर आणि पुरंदर तालुक्यांत सर्वाधिक 86 टक्के करवसुली झाली आहे. तर वेल्हा तालुक्यात सर्वांत कमी 79.60 टक्के वसुली झाली. ज्या ग्रामपंचायतींचे वसुलीचे प्रमाण अधिक असेल, त्या खर्‍या अर्थाने समृध्द बनतात. गावकीच्या राजकारणात थकबाकीचा आकडा दरवर्षी वाढतच असतो, त्यामुळे गावाच्या विकासावरही परिणाम होतो.

यावर्षीही वसुलीचे प्रमाण चांगले असले, तरी समाधानकारक नाही. 2022-23 मध्ये घरपट्टी आणि पाणीपट्टी कर वसुलीची थकबाकी 424 कोटी 79 लाख इतकी होती. त्यामध्ये घरपट्टी 365 कोटी, तर पाणीपट्टी 58 कोटी थकबाकीचा समावेश आहे. त्यातील 357 कोटी 76 लाख 25 हजार रुपयांची वसुली 31 मार्च 2023 अखेरपर्यंत करण्यात आली. त्यामध्ये घरपट्टी 307 कोटी 78 लाख, तर पाणीपट्टी 49 कोटी 97 लाख रुपयांची वसुली झाली आहे, अशी महिती जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे यांनी दिली. दरम्यान, शेवटच्या चार महिन्यांत वसुलीसाठी ग्रामपंचायतींनी विविध पथके तयार करून वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.

थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष शिबिरांचे गावोगाव आयोजन करण्यात आले होते. अखेरच्या चार महिन्यांमध्ये सुमारे चाळीस टक्क्यांपर्यंत वसुली झाली. चार महिन्यांपूर्वी 48 टक्के असलेली करवसुली 84 टक्क्यांपर्यंत ग्रामपंचायतींनी कर वसूल केला. गावचा विकास होण्यासाठी जास्तीत जास्त कर वसुली होणे आवश्यक असते, घरपट्टी आणि पाणीपट्टी या करवसुलीवर ग्रामपंचायतीचे सर्व अर्थकारण चालते. त्यासाठीच जिल्हा परिषदेकडून विशेष शिबिरे घेऊन वसुलीवर अधिक भर दिला होता.

Back to top button