विहिरींचे गतवैभव काळाच्या पडद्याआड ! | पुढारी

विहिरींचे गतवैभव काळाच्या पडद्याआड !

पेठ : पुढारी वृत्तसेवा : सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागातील बहुतांश जुन्या विहिरी आता कोरड्या पडल्या आहेत. या विहिरींवर पूर्वी मोठे वैभव होते. रचनाबद्ध दगडी बांधकाम, वडव, धारुळ, मोट, नाडा असा फौजफाटा त्यावर होता. आजूबाजूची सर्व पाळीव प्राणी, शेळ्या-मेंढ्या दुपारच्या वेळेत पाणी पिण्यासाठी या विहिरीजवळ जमा होत असत. हे सारे वैभव आता काळाच्या पडद्याआड गेले असून, या विहिरी आता फक्त ओसाड राहिल्या आहेत. मात्र, पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या चिमण्यांचा किलबिलाट तेथे ऐकू येत आहेत.

विहिरींची पाणीपातळी खोल गेली असली, तरी पूर्वीचे वैभव असलेल्या या विहिरींवर इतर झाडे-झुडपे व वडाची झाडे वाढली आहेत. या झाडांची मुळे व फांद्यामुळे या विहिरी पूर्ण घनदाट अरण्यात झाकून गेल्या आहेत. रानात असलेल्या विहिरींकडे कुणीही ढुंकून पाहत नाही. मात्र, मनुष्यवस्ती व वावर नसल्याने चिमण पाखरे येथे आपले घर करून आनंदात जीवन जगत आहेत. या विहिरींच्या काठावर झाडाच्या लोंबलेल्या फांद्यावर त्यांनी आपले घरटे निसर्गातील उपब्धतेनुसार साकारले आहे. सिमेंटच्या जंगलापासून दूर आपले घर असावे, असा मानवाला जणू संदेश त्या देत आहे.

भांडवल उपलब्ध झाल्यास विहिरींना ऊर्जितावस्था
जुन्या पिढीतील विहिरींचे अस्तित्व यांत्रिक युग आल्याने धोक्यात आले. चिमण्यांची घरटी विहिरीवर मोठ्या प्रमाणावर झाली असून, त्याप्रमाणे त्यांच्या आवाजाचा वेध घेत सरपटणारे प्राणीदेखील येत आहेत. जुन्या विहिरींचे पुनर्भरण केले, तर घरापासून दूर असलेल्या विहिरीवर परिसरातील पिके घेता येतील; पण त्यासाठी आर्थिक भांडवल मिळत नसल्याचे येथील शेतकरी विलासराव पवार, वसंतराव एरंडे यांनी सांगितले.

Back to top button