पाच टक्के लहान मुलांमध्ये आढळतो फोबिया; वाटते टोकाची भीती | पुढारी

पाच टक्के लहान मुलांमध्ये आढळतो फोबिया; वाटते टोकाची भीती

दीपेश सुराणा

पिंपरी : कोरोनामुळे जवळपास दोन वर्ष मुले घरूनच ऑनलाइन अभ्यास करत होती. त्यामुळे त्यांची शाळेविषयी असणारी आवड, ओढ कमी झाली. पर्यायाने, शाळा सुरू झाल्यानंतर मुलांना शाळेत जाण्याचीच भीती वाटू लागली. काही मुलांमध्ये ही भीती टोकाची होती. ही बाब विशिष्ट फोबियामध्ये मोडते. चारचौघांमध्ये उभे राहून बोलण्याची काही मुलांना खूप भीती वाटत असते. हा सोशल फोबिया असतो. 5 टक्के मुलांमध्ये सध्या फोबिया आढळतो आहे. मात्र, फोबियावर उपचाराने मात करणे शक्य असल्याने मुलांमध्ये हा आजार आढळल्यास पालकांनी घाबरुन जाऊ नये, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

फोबिया म्हणजे काय ?
कोणत्याही गोष्टीची प्रमाणाबाहेर अवास्तव भीती वाटणे म्हणजे फोबिया होय. एखाद्या असामान्य परिस्थितीत निर्माण होणारी भीती ही सामान्य प्रतिक्रिया आहे. परंतु जर व्यक्तीला एखादी परिस्थिती, वस्तू किंवा काम करण्याची अकारण व अनावश्यक भीती वाटायला लागते, त्याला फोबिया किंवा अतिभय म्हटले जाते. अशा परिस्थितीत व्यक्ती ती वस्तू किंवा परिस्थितीला वेगवेगळ्या प्रकारे टाळण्याचा प्रयत्न करत असते. दीड ते दोन वर्षाच्या मुलापासून पुढील सर्व वयोगटातील मुलांमध्ये फोबिया आजार आढळतो.

फोबिया कसा ओळखाल?
मुलांना ज्या परिस्थितीची, वस्तूची भीती वाटते अशा वस्तूच्या संपर्कात आल्यावर त्यांच्या अंगाचा थरकाप होतो. त्यांची भीती वाढत जाते आणि तिचे प्रमाण इतके वाढते की मुले पुढे-पुढे असे प्रसंग टाळू लागतात. काही मुलांना रक्त, इंजेक्शन आणि अपघाताची भीती वाटत असते. त्यामुळे अशा मुलांना केवळ इंजेक्शन दाखविले तरी ते गलितगात्र होतात. अपघाताची भीती असणारी मुले ट्रेनच्या प्रवासाला टाळाटाळ करु लागतात. काही मुलांना लिफ्ट, बंद जागा, रिकामा रस्ता, अंधार यांची भीती वाटत असते. अशा ठिकाणी ते जाणे टाळतात.

फोबियाचे प्रकार
अगोरा फोबिया, सोशल फोबिया आणि विशिष्ट फोबिया असे फोबियाचे मुख्यत्वे तीन प्रकार आहेत. लिफ्ट, बंद जागा, रिकामा रस्ता, अंधार आदींची वाटणारी भीती अगोरा फोबियामध्ये येते. इतर मुलांमध्ये न मिसळणे, अनोळखी माणसांना घाबरणे, चारचौघांशी बोलताना घाबरणे, गर्भगळित होणे या गोष्टी सोशल फोबियात मोडतात. तर, विशिष्ट फोबियामध्ये मुलांना विशिष्ट वस्तू, प्राणी, प्रसंग यांची भीती वाटते. विविध वस्तू, प्राणी, आजार, झुरळ, उंदीर, मांजर, पाल तसेच, रक्त, इंजेक्शन, अपघात तसेच शाळेची वाटणारी अवास्तव भीती विशिष्ट फोबियामध्ये येते.

फोबिया या आजाराचे प्रमाण मुलांमध्ये 5 टक्के इतके आढळते. एखाद्या गोष्टीची प्रमाणाबाहेर अवास्तव भीती वाटत असेल आणि त्यामुळे मुले ती गोष्ट करणे टाळत असतील तर त्याला फोबिया म्हणता येईल. फोबियावर 100 टक्के उपचार करता येतात. त्यासाठी मानसोपचार आणि औषधोपचार या दोघांची भूमिका महत्त्वाची आहे. ग्रेडेड डिसेन्सटाईजेशन या वर्तणूक उपचार (बिहेविअर थेरपी) पद्धतीद्वारे मुलांची भीती टप्प्याटप्प्याने कमी करता येते.

                                      – डॉ. भूषण शुक्ल, बाल मानसोपचार तज्ज्ञ.

Back to top button