सोने खरेदीमध्ये वाढ; वाहनांच्या खरेदीमध्ये 25 ते 30 टक्यांची वाढ | पुढारी

सोने खरेदीमध्ये वाढ; वाहनांच्या खरेदीमध्ये 25 ते 30 टक्यांची वाढ

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर पिंपरी-चिंचवड शहरात सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने, चांदी, दुचाकी, चारचाकी वाहने तसेच नवनवीन वस्तुंची खरेदी केली जाते. अनेकजण सोन्याचा छोटासा दागिना तरी खरेदी करतातच. या मुहूर्ताच्या केलेली सोने खरेदी ही अक्षय मानली जात असल्याने गेल्यावर्षी पेक्षा यंदाच्या अक्षयतृतियेस जास्त प्रमाणात सोन्याची खेरेदी केल्याची माहिती शहरातील सराफ व्यावसायिकांनी दिली. तर वाहनांमध्ये 25 ते 30 टक्यांची वाढ झाल्याचे दिसून आले.

या शुभमुहूर्तावर सोन्याचा दर प्रति तोळा 59720 रूपये तर चांदी 750 दहा ग्राम रूपये दराने विक्री झाली. लगीनसराई सुरु असल्याने अ‍ॅन्टीक वेडींग ज्वेलरीतील दागिन्यांना विशेष पसंती मिळत होती. त्याशिवाय, टेंपल ज्वेलरीची देखील खरेदी सुरु होती. दागिन्यांमध्ये छोटे आणि मोठे गंठण, अंगठी, कर्णफुले, झुमके, मोहनमाळ, चंद्रहार, गोफ अशा विविध दागिन्यांना मागणी होती. शहरात 400 पेक्षा अधिक सराफ व्यावसायिकांची दुकाने आहेत. त्यांची दिवसभरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली.

वाहनांच्या खरेदीत वाढ
अक्षयतृतीयेच्या मुहुर्तावर पिंपरी-चिंचवड शहरात दुचाकी व चारचाकी वाहनांच्या खरेदीमध्ये गेल्या वर्षीपेक्षा पेक्षा 25 ते 30 टक्यांनी वाढ झाली. छोट्या मोठ्या शोरूममध्ये ही अक्षय तृतीयेनिमित्त वेगवेगळ्या आकर्षक सुविधा होत्या. याचा फायदा घेण्यासाठी नागरिकांनी वाहनांच्या शोरूममध्ये गर्दी केली होती.

Back to top button