पिंपरी : रमजान ईदनिमित्त शहरातील मुस्लिम बांधवांनी सामुहिक नमाज पठणानंतर ईद मुबारक अशा शुभेच्छा देत एकमेकांची गळाभेट घेतली. पिंपरी -चिंचवड शहरातील 160 हून अधिक मशीद व मदरसांमध्ये तेथील मौलानांच्या नेतृत्वाखाली मुस्लिमबांधवांनी सामूहिकरित्या नमाज अदा करण्यात आली. ईदनिमित्त शनिवारी (दि. 22) सकाळीच मुस्लिमबांधव नवीन कपडे परिधान करून जवळच्या मशिद व मदरसांमध्ये आले होते.
चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवड स्टेशन, मोहनननर, चिखली घरकुल, खराळवाडी, पिंपरी, नेहरूनगर, इंद्रायणीनगर, लांडेवाडी, भोसरी, पिंपरी, काळेवाडी, कस्पटेवस्ती, थेरगाव-वाकड, काळाखडक, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, नवी सांगवी, जुनी सांगवी, निगडी, आकुर्डी, दळवीनगर, कासारवाडी, दापोडी आदी परिसरात मशिद व मदरशांमध्ये मुस्लिमबांधवांनी नमाज पढला.
या वेळी मुस्लिम बांधवांमध्ये ईदचा उत्साह द्विगुणित झाला होता. विविध ईदगाहमध्ये सकाळी वेगवेगळ्या वेळेत नमाजपठण केली गेली आणि अल्लाहजवळ 'दुआ' मागितली. दुआ संपल्यानंतर प्रत्येक जण एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा देत होते. रमजान हा इस्लामिक चांद्र पंचांगातील नववा महिना आहे. या काळात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास करून रोजा पाळला जातो. महिनाभर रोजे पाळून इंद्रिये आणि मनावर संयम ठेवण्याचा आणि बंधुत्वाचा संदेश देण्यात येतो.
सोशल मीडियातून शुभेच्छा
ईदच्या निमित्ताने सोशल मीडिया, फोनवरून सर्व धर्मिंयांकडून ईदच्या शुभेच्छा संदेश दिले गेले. तसेच शहरातील राजकीय नेते मंडळींनीदेखील मुस्लिमबांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तर सर्व धर्मियांनी एकत्रित शीरखुर्म्याचा आस्वाद घेतला.
मान्यवरांकडून ईदच्या शुभेच्छा
पिंपवड शहरातील विविध भागात राजकीय सामाजिक आदी क्षेत्रातील मान्यवरांनी मुस्लिमबांधवांची भेट घेऊन ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या. शुक्रवारी चंद्रदर्शन झाल्यामुळे शनिवारी शहरात ईद उत्साहात साजरी करण्यात आली. चिंचवडगाव येथील इदगाह मैदानावर मुस्लिमबांधवांना वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
माजी महापौर आझम पानसरे यांना अनेक मुस्लिम बांधवांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. चिंचवड स्टेशन येथे गौसीया जामा मशिदमध्ये अध्यक्ष झिशान सय्यद, युसूफ खान, समीर शेख, हबीब शेख आदींनी संयोजन केले. निगडी येथील नुरानी मजीदमध्ये अध्यक्ष रशिद शेख, जुहूर खान, लियाकत शेख, मुजीब शेख, सफद मुल्ला आदींनी व्यवस्थापन केले.
सर्वधर्मीयांबरोबर शिरखुर्म्याचा आस्वाद
ईदच्या दिवशी विविध प्रकारच्या सुका मेव्याचे मिश्रण असलेला शिरखुर्मा ईदच्या उत्सवाचा आनंद द्विगुणित करतो. शिरखुर्म्याची लज्जत चाखण्याकरिता सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रत्येक मुस्लिमबांधवांच्या घरात लगबग सुरू होती. महिलावर्ग सकाळपासून शिरखुर्मा बनविण्यात व्यस्त होते. शेजारी, ओळखीचे, मित्र परिवार यांना आमंत्रित करून शिरखुुर्म्याचा आस्वाद घेण्यात आला.