पिंपरी : अतिरिक्त पाणी उपलब्ध झाल्यानंतर दररोज पाणीपुरवठा | पुढारी

पिंपरी : अतिरिक्त पाणी उपलब्ध झाल्यानंतर दररोज पाणीपुरवठा

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : गेल्या साडेतीन वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहराला दोन दिवसांचे पाणी एक वेळ दिले जात आहे. पाणीपुरवठा व्यवस्थापन क्षमता वाढल्यानंतर तसेच, अतिरिक्त पाणी उपलब्ध झाल्यानंतर दिवसाआड पाणीपुरवठा बंद करून दररोज पाणीपुरवठा केला जाईल, असा दावा महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी शुक्रवारी (दि.21) केला आहे.

शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थापनाबाबत ते सोशल मीडियावर नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते. आयुक्त सिंह म्हणाले की, पवना धरणातून 510 आणि एमआयडीसीकडून 30 एमएलडी असे दररेजन 540 एमएलडी पाणी शहराला देत आहोत. हे पाणी शहरासाठी पुरेसे आहे. आंद्रा आणि भामा आसखेड प्रकल्पातून एकूण 267 एमएलडी पाणी मिळणार आहे. त्यानंतर दररोज पाणी देण्याचा विचार केला जाईल. हे पाणी पुढील 10 ते 12 वर्षांसाठी पुरेसे आहे.

शहरातील मोठ्या हाउसिंग सोसायट्यांनी ओल्या कचर्‍याची विल्हेवाट लावणे, सांडपाण्याचा पुनर्वापर, एसटीपी हे प्रकल्प राबवणे बंधनकारक आहे. त्यासाठी सोसायट्यांनी दक्षता घ्यावी. त्याची देखभाल व दुरूस्ती नियमित करून घ्यावी. त्यामाध्यमातून सोसायटींने वापरण्यासाठी पाणी वापरावे. सोसायट्यांना पालिका 140 ऐवजी 90 लिटर पाणी दररोज दिले जात आहे. उर्वरित पाणी सोसायटींने स्वत: तयार करणे अपेक्षित आहे. निगडी ते दापोडी या मार्गावर नवीन जलवाहिनी टाकण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे शहराच्या शेवटच्या टप्प्यातील दापोडी व सांगवीत पुरेसा प्रमाणात पाणी देता येणार आहे. तसेच, मार्गावरील गृहप्रकल्पांनाही पाणी मिळू शकेल, असे ते म्हणाले.

पाण्याची नासाडी करू नका
अनेक नागरिक रस्ते, अंगण, पार्किंग तसेच, वाहन धुण्यासाठी पिण्याचा पाण्याचा वापर करतात. तसे न करता आवश्यक असले त्या वेळी बादलीत पाणी घेऊन कमीत कमी पाण्याचा वापर करावा. थेट नळ्यास पाईप लावून पाण्याची नासाडी करू नये. कालचे पाणी शिळे समजून फेकून देऊ नये. कमीत कमी वापर करून पाण्याची बचत करावी. गळके नळ तात्काळ दुरूस्त करून घ्यावेत. पालिकेच्या वतीने पाणी गळती शोधून काढण्यावर भर देण्यात येत आहे. अनधिकृत नळजोड व पाणीचोरीबाबत कारवाई केली जात आहे, असे आयुक्त सिंह यांनी सांगितले.

Back to top button