पिंपरी : 11 व्यायामशाळा बंद ! नागरिकांच्या शरीरस्वास्थ्याचे पालिकेला नाही देणे घेणे | पुढारी

पिंपरी : 11 व्यायामशाळा बंद ! नागरिकांच्या शरीरस्वास्थ्याचे पालिकेला नाही देणे घेणे

मिलिंद शुक्ल

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर हे कामगार आणि कष्टकर्‍यांची नगरी म्हणून परीचित आहे. मात्र, या लाखो कष्टकर्‍यांच्या शरीर स्वास्थ्याची काळजी घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या केवळ 21 व्यायामशाळा असून 11 व्यायामशाळा बंद आहेत. कोट्यवधींची तरतूद असूनही महापालिका प्रशासनास नागरिकांच्या शरीस्वास्थ्याची काळजी नसल्याचे स्पष्ट होत आहे.

शहराने अनेक मल्ल आणि शरीरसौष्ठवपटू घडविले आहेत. पण त्यांना घडवताना महापालिकेचा वाटा हा अल्प असल्याचे व्यायामशाळांच्या आकडेवारीवरून लक्षात येते. तशात महापालिकेच्या आकडेवारीनुसार क्रीडा विभागाच्या एकूण 36 व्यायामशाळा आहेत. मात्र, प्रत्यक्ष यातील 11 बंद आहेत आणि 25 सध्या सुरू आहेत. त्यात सुरू असलेल्या 25 पैकी 4 व्यायामशाळा या सेवाशुल्कावर सामाजिक संस्था, संघटनांना चालविण्यास देण्यात आल्या आहेत.

तरतूद कोट्यवधींची…
क्रीडा विभागासाठी महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात 70 कोटी 47 लाख रुपयांची भांडवलीखर्चासाठी तरतूद केली आहे. तरीही व्यायामशाळा या इतर संस्थांना का चालवायला द्याव्या लागत आहेत. यातील व्यायामाची अत्याधुनिक साधने विकत घेता येतील एवढी तरतूद जर दर वर्षी होत आहे. कमीत कमी शुल्कात सर्व व्यायामशाळा का सामान्य व्यायामपटूंसाठी उपलब्ध होत नाहीत.

फी अशी वाढते…
हार्ड कोर आणि फिटनेस क्लब, असे व्यायामशाळांचे प्रकार आहेत. त्यातील उपप्रकारही खूप आहेत. हार्ड कोर म्हणजे व्यावसायिक शरीरसौष्ठवपटूसाठीचा जो व्यायाम असतो. त्यात सिक्स पॅक्स, एटपॅक्स, बॉक्सिंगसाठी किंवा कुस्तीसाठी हा वेगळा व्यायाम असतो. तर केवळ शरीरस्वास्थ्यासाठी हवे असेल तर सायकलिंग, हाताचे, पायाचे आणि छातीचे, असे साधारण व्यायाम असतात. यातील व्यावसायिक प्रशिक्षणासाठी जी साधने लागतात, ती महागडी असतात किंवा प्रशिक्षणही खर्चिक असते. त्यामुळे व्यायाम कोणता यावर फी वाढते..

महापालिकेच्या व्यायामशाळेसाठी जी फी आहे. तीच फी सेवाशुल्कावर दिलेल्या व्यायामशाळेसाठीही अनिवार्य आहे. काही व्यायामशाळा जादा पैसे आकारल्याच्या तक्रारी आहेत. त्याचे लवकरच निराकरण करू.

                        – मनोज लोणकर, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

यातील बंद असलेल्या काही व्यायामशाळेत नूतनीकरणाचे काम सुरू आहे. मॅट बसविण्याचे कामही अपुरे आहे. ते पूर्ण झाले की जास्त क्षमतेने त्या सुरू होतील.

                            -अनिल जगताप, पर्यवेक्षक, क क्षेत्रीय कार्यालय

Back to top button