आईचा हिस्सा दे, असे म्हणत एकावर कुर्‍हाडीने वार | पुढारी

आईचा हिस्सा दे, असे म्हणत एकावर कुर्‍हाडीने वार

पिंपरी : आमच्या आईचा हिस्सा दे, असे म्हणत एकावर कुर्‍हाडीने वार करण्यात आले. ही घटना बुधवारी (दि. 19) पहाटे चारच्या सुमारास खेड तालुक्यातील खालुम्ब्रे येथे घडली. अनिल दामोदर घनवट, सतीश अशोकराव वानखेडे, अक्षय सर्वगोड (सर्व रा. खालुम्ब्रे, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सतीश याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अशोक सुरेश तुळवे (37) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवारी पहाटे चारच्या सुमारास झोपेतून उठून फिर्यादी घराबाहेर आले. त्या वेळी आरोपी फिर्यादी यांच्या घराच्या बाहेर थांबले होते.

फिर्यादी यांनी आरोपींना एवढ्या सकाळी घरी येण्याचे कारण विचारले असता, माझ्या आईचा हिस्सा दे, असे म्हणून अनिल घनवट याने फिर्यादीवर कुर्‍हाडीने वार केले. त्यानंतर सतीश आणि अक्षय यांनी फिर्यादीस हाताबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. दरम्यान, भांडणाच्या आवाजाने फिर्यादी यांच्या घरातील इतर सदस्य घराबाहेर आले असता आरोपी पळून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Back to top button