पिंपरीत विविध शाळांसमोर धोकादायक जाहिरात होर्डिंग्स | पुढारी

पिंपरीत विविध शाळांसमोर धोकादायक जाहिरात होर्डिंग्स

पिंपरी : शहरातील विविध शाळांसमोर तसेच, शाळांच्या बसेस थांबण्याच्या जागेजवळ सध्या धोकादायक पद्धतीने जाहिरात होर्डिंग लावण्यात आल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. या होर्डिंग्जच्या विरोधात कारवाई करण्याबाबतची मागणी नागरिकांतून होवू लागली आहे. किवळे येथील जाहिरात होर्डिंग सोमवारी (दि. 17) कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला. तर, तिघे जखमी झाले. त्यानंतर महापालिका प्रशासनाने अनधिकृत होर्डिंग काढण्याची मोहीम हाती घेतली. त्याचप्रमाणे, जाहिरात होर्डिंग मजबुतीचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट (स्थिरता प्रमाणपत्र) 15 दिवसांत महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडे सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

दरम्यान, शहरातील विविध शाळांसमोर मोठे-मोठे होर्डिंग पाहण्यास मिळत आहे. शाळेच्या प्रवेशद्वारासमोर प्रामुख्याने असे होर्डिंग पाहण्यास मिळतात. चिंचवड, चिंचवड स्टेशन, पिंपरी, चिखली, इंद्रायणीनगर आदी परिसरातील शाळांजवळ विविध जाहिरात होर्डिंग्स आहेत.

त्याचप्रमाणे, मोशी-बोर्‍हाडेवाडी येथे खासगी शाळेच्या बसेस थांबणार्‍या जागेजवळ होर्डिंग लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे शाळेतून ये-जा करणार्‍या मुलांना त्याचा धोका संभवतो. ही बाब लक्षात घेता मुलांच्या शाळेसमोर असणारे धोकादायक होर्डिंग ताबडतोब काढण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

महापालिकेच्या वतीने अनधिकृत होर्डिंगच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे. शहरात अनधिकृत 65 होर्डिंगवर दोन दिवसांत कारवाई केली जाणार आहे. त्याचप्रमाणे, अधिकृत जाहिरात होर्डिंगच्या बाबतीत मजबुतीचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट (स्थिरता प्रमाणपत्र) 15 दिवसांत महापालिकेला सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

                                                  – नीलेश देशमुख,
                                          सहाय्यक आयुक्त, महापालिका.

शहरातील लहान मुलांच्या बर्‍याच शाळांसमोर तसेच शाळेच्या बस ज्या ठिकाणी उभ्या राहतात, अशा ठिकाणी मोठे होर्डिंगचे सांगाडे उभे केलेले आहेत. ही खूप धोकादायक बाब आहे. सदर होर्डिंगसाठी कोणी कशी परवानगी दिली हे अनाकलनीय आहे. शहरातील अशा सर्वच शाळांसमोर असणारे होर्डिंग त्वरित काढून घ्यावे. त्याबाबत आम्ही आयुक्त शेखर सिंह यांनाही पत्र दिले आहे.

                                            – संजीवन सांगळे, अध्यक्ष,

Back to top button