पुणे : इनामगाव-न्हावरे महामार्गावर अपघातात लक्षणीय वाढ | पुढारी

पुणे : इनामगाव-न्हावरे महामार्गावर अपघातात लक्षणीय वाढ

मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा : इनामगाव ते न्हावरे महामार्गावरील इनामगावसह शिरसगाव काटा, तांदळी, निर्वी, पिंपळसुटी (ता. शिरूर) हद्दीत अपघातांची संख्या गेल्या दोन महिन्यांपासून वाढली आहे. इनामगाव येथे बुधवारी (दि. 19) सायंकाळी 5 वाजता भरधाव कार पिकअप जीपला पाठीमागून धडकली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र कारचालकासह लहान मुलगा जखमी झाला. वारंवार होणार्‍या अपघातांमुळे येथील महिला, शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक जीव मुठीत घेऊन महामार्ग ओलांडावा लागत आहे. लवकरात लवकर उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी सरपंच पल्लवी घाटगे, माजी उपसरपंच शिवाजी मचाले यांनी केली आहे.
इनामगाव ते न्हावरे दरम्यान एनएच 548 डी हा महामार्ग तयार करण्यात आला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू आहे.

इनामगावातच काही दिवसांपूर्वी दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. शिरसगाव काटा येथे जिल्हा परिषद शाळा या महामार्गालगत
असल्याने अनेक शाळकरी मुले रस्ता ओलांडत असतात. त्यांच्याही जीवितास धोका आहे. शिरसगाव काटा ते निर्वी गावादरम्यान युवकांना जीव गमवावा लागला आहे. या महामार्गावर काही गावांनजीक तीव— उतार व वळणे असल्याने तेथेही अपघातप्रवण क्षेत्र झाले आहे. भरधाव वेगाने वाहने जात असताना अपघात होत आहेत. सध्या अनेक गुर्‍हाळ उद्योग सुरू असल्याने या महामार्गावर ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर-ट्रॉलीमुळे रात्रीच्या वेळी इतर वाहनांना अपघात होत आहेत.

दुसरीकडे शिरसगाव काटा व इनामगावजवळ महामार्गाचे काम अर्धवट राहिले असून, त्या ठिकाणी घसरून दुचाकीचालक जखमी होत आहेत. या ठिकाणी महामार्गाचे काम पूर्ण करावे, तसेच आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी माजी उपसरपंच शिवाजी मचाले यांनी केली आ, त्यामुळे या ठिकाणी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सरपंच घाटगे व माजी उपसरपंच मचाले यांनी केली आहे.

Back to top button