कॅमेरा…अ‍ॅक्शन… कट कट कट ; सतत बदलणार्‍या वातावरणाचा होतो आहे पुण्यातील चित्रीकरणावर परिणाम | पुढारी

कॅमेरा...अ‍ॅक्शन... कट कट कट ; सतत बदलणार्‍या वातावरणाचा होतो आहे पुण्यातील चित्रीकरणावर परिणाम

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  दिवसभर रणरणते ऊन आणि सायंकाळी पडणारा पाऊस…तर रात्रीचा गारवा अशा सततच्या बदलणार्‍या वातावरणामुळे सध्या पुण्यात जाहिरातींपासून ते चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे काही निर्मात्यांनी-दिग्दर्शकांनी आऊटडोअर चित्रीकरण रद्द केले आहे. त्याचा आर्थिक फटकाही त्यांना बसत आहे.

पुण्यामध्ये कोथरूड, भोर, मुळशी अशा विविध भागांमध्ये चित्रपट, मालिका, वेब सिरीज, म्युझिक अल्बम, जाहिरातींचे चित्रीकरण सुरू आहे. पण, दिवसभर ऊन आणि सायंकाळी पडणार्‍या पावसामुळे अनेक निर्माते-दिग्दर्शकांना आऊटडोअर चित्रीकरणाला कंटाळले आहेत. त्यामुळे पुण्यात इनडोअर चित्रीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. उन्हापासून बचावासाठी सकाळी आणि सायंकाळी चित्रीकरण उरकले जात आहे. उन्हामध्ये चित्रीकरण करणे कलाकार-तंत्रज्ञांसाठी अडचणीचे जात आहे. त्यावर उपाय काही दिग्दर्शकांकडून सकाळी 8 ते 10 आणि सायंकाळी 5 ते 9 यावेळेतच चित्रीकरण करण्यात येत आहे.

उन्हाळ्याच्या सीझनमध्ये शक्यतो दुपारी आऊटडोअर चित्रीकरण केले जात नाही. मुंबईमध्ये वातानुकूलित सेट उपलब्ध आहेत. पुण्यात ती परिस्थिती नाही. यंदाही तीच परिस्थिती आहे. सध्या सकाळी आणि सायंकाळी चित्रीकरण उरकले जात आहेत. उन्हाळ्यात चित्रीकरण करणे खूप खर्चीक बाब आहे. ते निर्मात्यांना परवडणारे नसते. पण, जोखीम घेऊन त्यांना चित्रीकरण करावे लागत आहे. बदलत्या वातावरणाचा परिणाम चित्रीकरणाला बसत आहे.
                                                      – राजेंद्र खेडेकर, चित्रपट दिग्दर्शक

उन्हामुळे अनेक चित्रीकरण रद्द होत आहेत. कलाकारांना अडचण समजून घेऊन दुपारी आऊटडोअर चित्रीकरण टाळले जात असून, सायंकाळी पावसामुळेही चित्रीकरण रद्द होत आहेत. त्यामुळे अनेक निर्माते-दिग्दर्शक आणि कलाकार इनडोअर चित्रीकरणावर भर देत आहेत. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी अनेकांनी चित्रीकरणाच्या तारखाही बदलल्या आहेत.
                                                  – मेघराज राजेभोसले, चित्रपट निर्माते

Back to top button