

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत उन्हाळ्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. सरासरीपेक्षा 78 टक्के पाऊस जास्त झाला; कारण वातावरणातील अस्वस्थता, वाढते तापमान आणि वाढती आर्द्रता, ही प्रमुख कारणे यामागे आहेत. शहरावर क्युम्युनोलिंबस (जास्त बाष्प असणारे ढग) ढगांचे प्रमाण वाढत असल्याचाही हा परिणाम आहे. शहरात यंदा संपूर्ण मार्च महिन्यात दररोज पाऊस झाला तसेच एप्रिलमध्ये त्यांची वारंवारिता अधिकच वाढली. हंगामात 45 मि. मी. इतका पाऊस झाला. त्याचे प्रमाण मागच्या वर्षाच्या तुलनेत दुपटीने जास्त आहे.
दीड महिन्यात सुमारे 78 टक्के अधिक पाऊस शहरात झाला आहे. याचे कारण जाणून घेतले असता, वाढते तापमान, मध्येच पडणारा पाऊस आणि वाढती आर्द्रता, हे आहे. या वातावरणाला हवामानाच्या भाषेत 'अस्वस्थ वातावरण' म्हणतात. तसे वातावरण सतत तयार होत असल्याने शहरात उन्हाचा कडाका असतानाही पाऊस पडत आहे.
बाष्पयुक्त ढगांचे प्रमाण वाढले…
सतत पाऊस पडत असल्याने शहरात आर्द्रता 60 टक्क्यांवर गेली आहे. तसेच वाढते तापमान आणि वार्यांची खंडितता होऊन वातावरणात अस्वस्थता निर्माण होऊन क्युम्युनोलिंबस ढगांचे (जास्त बाष्प असणारे ढग) प्रमाण वाढत आहे. त्या ढगांमुळे गारांसह विजांचा कडकडाट अन् पाऊस पडत आहे.
हा विक्रमी पाऊस नाही…
शहरात यंदाच्या उन्हाळ्यात पडत असलेला पाऊस निश्चितच मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त आहे. पण, गेल्या दशकातला विक्रमी नाही. कारण, असाच पाऊस 2021 मध्ये झाला होता, असेही डॉ. होसाळीकर यांनी सांगितले.
पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. कृष्णानंद होसाळीकर म्हणाले की, बंगालच्या उपसागराकडून बाष्पयुक्त वारे येत आहे, तर अरबी समुद्राकडून उष्ण व दमट वारे येत आहे. त्यांची टक्कर झाली की, ढग तयार होतात, त्यामुळे अधिक पाऊस पडत आहे.
– डॉ. के. एस. होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, पुणे हवामान विभाग