अक्षयतृतीयेनिमित्त बाजारात चैतन्य | पुढारी

अक्षयतृतीयेनिमित्त बाजारात चैतन्य

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मंदिरांमध्ये केलेली फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई…धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल…घराघरांमध्ये चाललेली पंचपक्वानांची तयारी आणि नवीन वस्तूंच्या बुकिंगसाठी दालनांमध्ये आलेले पुणेकर…असे आनंदी वातावरण शुक्रवारी अक्षयतृतीयेच्या पूर्वसंध्येला ठिकठिकाणी पाहायला मिळाली. अक्षयतृतीया शनिवारी (दि.22) साजरी होणार असल्याने सगळीकडे उत्साहाची लहर पाहायला मिळाली. खासकरून बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी लगबग पाहायला मिळाली आणि आंबा खरेदीसह पुणेकरांनी नवीन वस्तूंच्या खरेदीसाठी बुकिंगचा मुहूर्तही साधला. त्याशिवाय मंदिरांमध्येही खास तयारी करण्यात आली असून, मंदिरे दर्शनासाठी दिवसभर खुली राहणार आहेत. त्याशिवाय भजन-कीर्तनासह प्रवचन, भक्तिगीतांचे कार्यक्रमही मंदिरांमध्ये होणार आहे. तसेच घराघरांमध्ये मनोभावे लक्ष्मी-नारायणांची पूजा होणार आहे.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. विवाह, गृहप्रवेश आणि नवीन कार्याच्या शुभारंभासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. तसेच आपल्या पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी घरोघरी पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे आदराने पूजन केले जाते. त्याशिवाय या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करण्यासह दागिने, कपडे, वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचीही खरेदी केली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सण उत्साहात साजरा केला जाणार असून, पुणेकरांमध्ये सणाविषयीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. अक्षयतृतीयेच्या दिवशी आमरसासह विविध पंचपक्वानांचा बेतही आखला जाणार असून, देवी-देवतांच्या पूजेसह त्यांना पंचपक्वानांचा नैवेद्यही दाखविला जाणार आहे. याशिवाय पूर्वजांचे स्मरण करीत त्यांच्या प्रतिमेचे पूजनही होईल. त्याचबरोबर लक्ष्मी-नारायण यांच्या विधिवत पूजेसह गरजूंना दानही केले जाणार आहे. अक्षयतृतीयेच्या निमित्ताने शुक्रवारी (दि.22) खरेदीसाठी बाजारेपठांमध्ये लगबग दिसून आली.

सुवर्ण खरेदीचा आज अक्षय्य मुहूर्त
सोन्याचे भाव वधारले असले, तरी काही खास मुहूर्तांना सोने खरेदी हमखास केली जाते. त्यापैकीच एक दिवस म्हणजे अक्षयतृतीया. हा मुहूर्त साधत सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणार्‍यांची संख्या मोठी आहे. शहरातील सराफा बाजार सज्ज झाला असून घडणावळीवर आकर्षक सूट देण्यासह विविध भेटवस्तूंच्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. अक्षयतृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे किंवा सोन्याचे दागिने भेट म्हणून दिल्यास ते अक्षय्य म्हणजेच कधीही संपत नाहीत, अशी मान्यता आहे. शिवाय या दिवशी कोणताही मुहूर्त पाहवा लागत नसल्याने किरकोळ खरेदी करणारे ग्राहक थेट सराफा दुकानात येऊन दागिने खरेदी करतात. त्या पार्श्वभूमीवर सराफा व्यावसायिकांनी विविध आकर्षक सवलती तसेच भेटवस्तू जाहीर केल्या आहेत. यामध्ये, सोने खरेदीवर तेवढीच चांदी फ—ी, लकी ड्रॅा कूपन, मजुरीवर सूट, पैठणी साडीसह आकर्षक भेटवस्तू ठेवण्यात आल्याचे चित्र आहे. देवकर ज्वेलर्सचे दत्तात्रय देवकर म्हणाले, बाजारात (दि. 22) 24 कॅरेट सोन्याचे दर 60 हजार 370 रुपये तर 22 कॅरेटचे दर 57 हजार 500 रुपये प्रतितोळा असे आहेत.

Back to top button