पुणे : पाच घरफोड्यांत अकरा लाखांचा ऐवज चोरीला | पुढारी

पुणे : पाच घरफोड्यांत अकरा लाखांचा ऐवज चोरीला

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील विविध भागांत पाच घरफोड्यांत चोरट्यांनी 10 लाख 90 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रामुख्याने बंद घरांना चोरट्यांकडून टार्गेट केले जात असल्याचे चित्र आहे. दरम्यान, घरफोड्या रोखण्यासाठी पोलिसांकडून विविध उपायोजना सुरू असल्याचा दावा फोल असल्याचे दिसून येते आहे. नर्‍हे येथील महालक्ष्मी पॅलेस या सदनिकेतून चोरट्यांनी 1 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. त्यामध्ये सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे.

याबाबत प्रशांत हनमघर (40) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या सदनिकेचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूमधील कपाटात ठेवलेले दागिने चोरी करून पळ काढला. खेसे पार्क लोहगाव येथील एका सदनिकेच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी 1 लाख 80 हजार रुपये किमतीचे दागिने चोरी केले. याबाबत पिंपळे सौदागर येथील 35 वर्षीय महिलेने विमानतळ पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीच्या वडिलांचे हे घर आहे. ते बंद असताना दरवाजाचे लॉक तोडून चोरट्यांनी ही चोरी केली आहे. तसेच गुरूद्वारा रोड लोहगाव येथील गुलाब ओव्हाळ (68) यांच्या सदनिकेचा दरवाजा तोडून चोरट्यांनी बुधवारी (दि.19) चोरी केली. 2 लाख 81 हजार रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी चोरी करून पळ काढला. विमानतळ पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

साडेसतरानळी हडपसर येथील एका बंद सदनिकेतून चोरट्यांनी तब्बल 10 तोळे सोन्याचे दागिने व रोकड असा 4 लाख 67 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. याबाबत 36 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार हडपसर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. तर वडाचीवाडी उंड्री येथील द वात्सल्य स्कूलमध्ये चोरट्यांनी 72 हजार रुपयांची रोकड चोरी केली. तर संगणकाच्या सीपीयूचे नुकसान केले. याबाबत 54 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 18 ते 19 एप्रिलच्या कालावधीत घडली.

Back to top button