पुणे : दामदुप्पटचे आमिष; 16 कोटींची फसवणूक ; हजारो गुंतवणूकदारांना गंडा | पुढारी

पुणे : दामदुप्पटचे आमिष; 16 कोटींची फसवणूक ; हजारो गुंतवणूकदारांना गंडा

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  गुंतवणुकीवर दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणुकदारांची 16 कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी एपीएस वेल्थ व्हेन्चेर्सच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दोघे पतीपत्नी संचालक फरार झाले असून, त्यांनी शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचे सांगितले जात आहे. पुणे, मुंबई, विदर्भासह इतर शहरातील नागरिक विशेषत: शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी त्याच्या योजनेत पैसे गुंतवले असल्याची माहिती आहे. एपीएस वेल्थ व्हेंचर्श एलएलपी या कंपनीचे संचालक अविनाश अर्जुन राठोड, त्याची पत्नी विशाखा अविनाश राठोड (रा.आनंदबन सोसायटी, रावेत) व त्याचे साथीदार अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. वाकड येथील एका डॉक्टरांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश राठोड याने एपीएस ही शेअर मार्केट कंपनी स्थापन केली. गुंतवणुकदारांना दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखविले. सुरुवातीला त्याने काही जणांना पैसे परतही केले. त्यामुळे त्याच्यावर विश्वास बसल्याने पुणे, मुंबई, विदर्भासह इतर शहरातील नागरिक विशेषत: शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना त्याच्या योजनेत पैसे गुंतवले. जवळपास 20 महिन्यांनंतर मार्च 2023 मध्ये या गुंतवणुकदारांचे पैसे परत करण्याची वेळ आली. लोक पैसे मागू लागले. तेव्हा त्याने प्रकृतीचे कारण सांगून 10 एप्रिल 2023 पर्यंत वाट पाहण्याची विनंती केली. याकाळात त्याची पत्नी विशाखा राठोड हिने कार्यालयात येणर्‍या गुंतवणुकदारांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडून वेळ मागून घेतला. गुंतवणुकदार त्यांच्याशी संपर्क करु लागले तर त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचे पाहून लोकांनी गुन्हे शाखेकडे धाव घेतली. फिर्यादींचे 86 लाख 37 हजार रुपये तसेच इतर शेकडो गुंतवणुकदारांचे मिळून 15 कोटी 45 लाख रुपये असे 16 कोटी 31 लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्या आहेत.

Back to top button