पुणे : दुसर्‍या दिवशीही शहरात होर्डिंगवर कारवाई | पुढारी

पुणे : दुसर्‍या दिवशीही शहरात होर्डिंगवर कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेकडून शहरातील अनधिकृत होर्डिंगवर जोरदार कारवाई सुरू असून, बुधवारी 29, तर गुरुवारी 15 होर्डिंग जमीनदोस्त करण्यात आले. अधिकृत होर्डिंगच्या स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीचा अहवाल पंधरा दिवसांत सादर करण्याचे आदेश आकाशचिन्ह व परवाना विभागाने होर्डिंग मालकांना दिले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुणे महापालिका खडबडून जागी झाली आहे.

अनधिकृत होर्डिंगवर जोरदार कारवाई सुरू असून, सर्वाधिक अनधिकृत होर्डिंग असलेल्या उपनगरांसह समाविष्ट गावांच्या हद्दीत कारवाई करण्यावर भर देण्यात येत आहे. कारवाईंतर्गत बुधवारी 21 होर्डिंग उतरविले गेले. गुरुवारीही ही कारवाई सुरू होती, दुपारपर्यंत पंधरा होर्डिंग उतरविण्यात आले. महापालिका अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांनी गुरुवारी प्रत्यक्ष कारवाईच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. अनधिकृत होर्डिंग उतरविण्याची कारवाई सातत्याने सुरू राहणार आहे.

पावसाळा येऊ घातला आहे, या कालावधीत जोरदार वारे वाहून होर्डिंग कोसळू नये, याची काळजी घेण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. तसेच अधिकृत होर्डिंगच्या मालकांना त्याचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी करून घेण्यास सांगितले. पुढील पंधरा दिवसांत त्यांनी हे काम करणे अपेक्षित आहे; अन्यथा पुढील कारवाई केली जाणार आहे. आम्हाला संशयास्पद वाटणार्‍या स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी अहवालाची फेरतपासणी आम्ही करून घेणार असल्याचे खेमणार यांनी सांगितले.

Back to top button