

पुढारी ऑनलाईन : पुणे शहराला विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह गुरुवारी पावसाने चांगलेच झोडपले. गेल्या दोन तीन दिवसांपासून दिवसा प्रचंड गरमी जाणवत होती. त्यानंतर आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दिवसभर घामेघूम झालेल्या पुणेकरांना वरूणराजाच्या आगमनाने दिलासा मिळाला आहे. परंतु, अचानक झालेल्या पावसाने पुणेकरांची चांगली तारांबळ उडाल्याचे दिसून आले आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपासून तापमान चांगेलच वाढले होते. दिवसा प्रचंड गरमी जाणवत होती. मंगळवारपासून शहरातील कमाल तापमानाचा आकडाही चाळीशीमध्ये पोचला होता. त्यामुळे घराबाहेर पडल्यानंतर उन्हाचे चटके अंगाला बसत होते. गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आकाश भरून आले आणि ढगांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुणेकरांची चांगली तारांबळ उडाली. कोथरूड, आंबेगाव पठार, कर्वे नगर, वारजेसह शहराच्या इतर भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारांचा पाऊस देखील झाला.