

भोर : पुढारी वृत्तसेवा : भोर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी फुटली असून, राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या महाविकास आघाडीच्या कट्टर विरोधकांना सोबत घेऊन काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्याविरोधात संघर्ष परिवर्तन पॅनेल निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. विशेष म्हणजे, ठाकरे गटाच्या शिवसेनेनेही या पॅनेलला साथ दिली आहे.
भोर येथील राष्ट्रवादी पक्षकार्यालयात बुधवारी (दि. 19) झालेल्या पत्रकार परिषदेत या पक्षाच्या पदाधिकार्यांनी पॅनेलची घोषणा केली. या वेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा बँकेचे तज्ज्ञ संचालक भालचंद्र जगताप, माजी सभापती मानसिंग धुमाळ, शिवसेनेचे (ठाकरे गट) तालुकाध्यक्ष माऊली शिंदे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि शिवसेना (शिंदे गट) नेते अमोल पांगारे, भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, संघर्ष परिवर्तन पॅनेलचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
धरणग्रस्तांची जी अवस्था झाली तशीच अवस्था भोर बाजार समितीची सत्ताधार्यांनी केली आहे. पुणे, मुंबई, बेळगाव येथील
बाजाराशी भोर बाजार समिती निगडित असूनदेखील येथील असणार्या सर्व अपुर्या सुविधांमुळे मार्केटची निर्मिती झाली.
परंतु, किकवीचा बाजार सोडला तर कोणताच व्यवहार होत नाही. सोसायटी, ग्रामपंचायतीचा आर्थिक कणा मानली जाणारी बाजार समिती नावारूपाला येण्याऐवजी इतर बाजार समित्यांच्या तुलनेने तोट्यात असल्याने लोकांची कुचंबणा होत आहे, ती थांबवून संस्थेचा खर्या अर्थाने शेतकर्यांसाठी पुरेपूर फायदा व्हावा. यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप पक्ष एकत्र येऊन संघर्ष परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून 14 उमेदवारांची वज्रमूठ तयार केल्याचे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे यांनी सांगितले.
जिल्हा बँकेकडे राजगड सहकारी साखर कारखान्याने कर्जाच्या रकमेचे व्याज कमी करावे, असा अर्ज केला आहे. परंतु, बँकेने याचा विचार केला, तर नऊ संचालक कामाला लागून त्यांचे संचालकपद रद्द होईल. 27 कोटींच्या घरात तोट्यात असणार्या राजगड सहकारी कारखान्याप्रमाणे बाजार समितीची अवस्था होऊ नये, असे तज्ज्ञ संचालक भालचंद्र जगताप यांनी सांगितले. संघर्ष परिवर्तन पॅनेलचे उमेदवार पुढीलप्रमाणे : सर्वसाधारण सात जागा : मोहन आनंदराव इंदलकर (खोपी), दिलीप पंढरीनाथ धुमाळ (ब—ाह्मणघर), रवींद्र सोपान कोंढाळकर (चिखलावडे), वसंत लक्ष्मण कुडले (नांदगाव), अमोल भाऊसाहेब लिमन (पारवडी), विजय जगन्नाथ कोंडे (केळवडे), विनोद रामचंद्र चौधरी (निगडे).
महिला प्रतिनिधी दोन जागा : संगीता भगवान आवळे (वाघजवाडी), वंदना शांताराम गोरड (गोरड म्हसली). इतर मागास एक जागा : गणेश आत्माराम गोळे (करंदी खेबा). भटक्या-विमुक्त एक जागा : काशिनाथ ज्ञानोबा बोंद्रे (न्हावी). ग्रामपंचायत
सर्वसाधारण दोन जागा : संतोष पांडुरंग बोबडे (राजापूर), भरत रघुनाथ बांदल (गोकवडी). आर्थिक दुर्बल घटक एक जागा : महिंद्र मोहन भोरडे (वरवे खुर्द) असून, राष्ट्रवादी 10 जागा, शिवसेना 3, भाजप 1 अशा पद्धतीने जागांचे वाटप करण्यात आलेले आहे.