‘पेढे घ्या, पेढे…’ म्हणत साडेतीन टन पेढे वाटप ! शिरूर तालुक्यातील सादलगाव येथील अनोखी यात्रा | पुढारी

‘पेढे घ्या, पेढे...’ म्हणत साडेतीन टन पेढे वाटप ! शिरूर तालुक्यातील सादलगाव येथील अनोखी यात्रा

मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा :  सध्या सर्वत्र यात्रांचा हंगाम सुरू आहे. अनेक भागांत गावोगावी यात्रांचे वेगळे वैशिष्ट्य असते. शिरूर तालुक्यातील सादलगाव ही यात्रा विशेष प्रसिद्ध आहे ती पेढ्यांसाठी! ’पेढे घ्या, पेढे…’ असे म्हणत दिवसभरात येथे तब्बल साडेतीन टन पेढे वाटप झाले. सादलगाव (ता. शिरूर) येथील ग्रामदैवत श्री बापूजीबुवा यात्रा महोत्सवास बुधवार (दि. 19) पासून प्रारंभ झाला. सादलगाव येथील भीमा नदीपात्रात बापूजीबुवा देवाचे आकर्षक असे पुरातन मंदिर आहे. नदी कोरडी झाल्यानंतर या ठिकाणी दर्शन घेता येते. पावसाळ्यात नदीला पाणी असल्याने मंदिराच्या चहूबाजूने पाणी असते.

यात्रेच्या दिवशी शिरूर, श्रीगोंदा, दौंड तसेच जिल्ह्यातील हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. गावातून पालखी वाजतगाजत निघाल्यानंतर मंदिराजवळ येते. या वेळी मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात येते. ठीक 12 वाजता एकाच वेळी हजारो नागरिक मंदिराजवळ नारळ फोडतात व त्याचवेळेस पेढे वाटप केले जाते. हे पेढे वाटल्यानंतर घरी नेले जात नाही. बुधवारी सुमारे साडे तीन टन पेढे मंदिर परिसरात वाटले गेले. या भाविकांना संत निरंकारी मंडळाने मोफत शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. या पालखी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले होते. या वेळी मोठ्या संख्येने भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. यात्रेनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली होती.

Back to top button