पुणे : साखर उद्योगाच्या नफ्यासाठी ‘एनर्जी हब’ | पुढारी

पुणे : साखर उद्योगाच्या नफ्यासाठी ‘एनर्जी हब’

पुणे : पुढारी वृत्तसेवा : देशातील साखर उद्योगाने साखरेसह इथेनॉल, कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी), पोटॅश, बगॅससह अन्य उपउत्पादनांवर भर दिल्याने कारखान्यांचे आर्थिक ताळेबंद घाट्यातून फायद्यात (पॉझिटिव्ह नेटवर्थ) आल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनुदानाची आता गरज नसून ‘एनर्जी हब’ तयार करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. त्याद्वारे शाश्वत आणि नफ्यातील साखर उद्योग कसा राहील, यावर लक्ष केंद्रित करण्यात आल्याची माहिती केंद्रीय साखर विभागाचे अतिरिक्त सचिव सुबोधकुमार सिंग यांनी दिली.

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (विस्मा) पुढाकाराने आयोजित ‘साखर उद्योगासाठी जैवइंधन व जैवऊर्जा’ या विषयावरील आयोजित परिसंवादात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी व्यासपीठावर केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे सहसचिव दिनेश जगदाळे, ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, सचिव पांडुरंग राऊत, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, रवी गुप्ता आदींसह 200 साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.देशात नव्या साखर हंगामाच्या तोंडावर पूर्वी 145 लाख टन साखरेचा जादा शिलकी साठा राहत असे. तो आता 60 लाख टनांपर्यंतच मर्यादित केला.

कारण, देशाची गरज पूर्ण करून 60 लाख टन साखर निर्यात केली. शिवाय, इथेनॉल उत्पादन तयार करून साखरेचे 45 लाख टनांनी उत्पादन कमी करण्यास आपल्याला यश आल्याचे ते म्हणाले. या वेळी ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, जयप्रकाश दांडेगावकर यांनी साखर उद्योगाच्या समस्या मांडल्या.

Back to top button