बारामती एमआयडीसीकडून दूषित पाणीपुरवठा ; उद्योजकांची तक्रार | पुढारी

बारामती एमआयडीसीकडून दूषित पाणीपुरवठा ; उद्योजकांची तक्रार

जळोची : पुढारी वृत्तसेवा :  बारामती औद्योगिक क्षेत्रात एमआयडीसीकडून दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या अनेक तक्रारी उद्योजकांकडून प्राप्त होत आहेत. याबाबत गंभीर दखल घेऊन एमआयडीसीने अत्याधुनिक जलशुद्धीकरण यंत्रणा बसवून पिण्यायोग्य पाणीपुरवठा करावा; अन्यथा दूषित पाण्यामुळे ऐन उन्हाळ्यात आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतील, असा इशारा बारामती इंडस्ट्रिअल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (बिमा) अध्यक्ष धनंजय जामदार व उद्योजकांनी एमआयडीसी प्रशासनाला दिला आहे.
बारामती एमआयडीसीमधील जलशुद्धीकरण प्रकल्पाला ‘बिमा’च्या पदाधिकार्‍यांनी भेट दिली, त्या वेळी ते बोलत होते.

बारामती एमआयडीसीमधील उद्योगांना पुरविण्यात येणार्‍या पाण्याला रंग व दुर्गंधी येत असून, औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक व कामगार हे पाणी पिण्यास नकार देत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारामती विभागाचे कार्यकारी अभियंता नीलेश मोढवे, उपअभियंता सुनील गायकवाड यांच्यासह ‘बिमा’चे अध्यक्ष धनंजय जामदार, उपाध्यक्ष शरद सूर्यवंशी, सचिव अनंत अवचट व ज्येष्ठ उद्योजक विजय झांबरे यांनी एमआयडीसी जलशुद्धीकरण प्रकल्पाला संयुक्त भेट दिली व जलशुद्धीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती घेतली.

जामदार म्हणाले की, एमआयडीसीचा जलशुद्धीकरण प्रकल्प 30 वर्षांपूर्वी उभारलेला असून, पारंपरिक पद्धतीने जलशुद्धीकरण केले जाते. मात्र, उजनीच्या पाण्याचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला असून, आता जुनी यंत्रणा बदलून नवीन तंत्रज्ञानयुक्त जलशुद्धीकरण यंत्रणा बसविणे अत्यावश्यक झाले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या माध्यमातून अत्याधुनिक जलशुद्धीकरण यंत्रणा प्रकल्प मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे धनंजय जामदार यांनी सांगितले.

बारामती एमआयडीसीमधील जलशुद्धीकरण प्रकल्पातील महत्त्वाच्या घटकांचे आधुनिकीकरण करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविलेला असून, लवकरच त्या माध्यमातून जलशुद्धीकरण अधिक प्रभावीपणे करता येईल. तसेच, baraaउद्योगांच्या पाणीविषयीच्या तक्रारींची त्वरित दखल घेऊन कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही मोढवे यांनी शिष्टमंडळाला दिली.

Back to top button