

दौंड : पुढारी वृत्तसेवा : दौंड शहरात महावितरणच्या मनमानी कारभाराला नागरिक पूर्णपणे वैतागले असून, त्याचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. शहरात दररोज दिवसातून चार ते पाचवेळा वीजपुरवठा खंडित होतो. अधिकार्यांना विचारले असता त्यांच्याकडून दुरुस्ती चालू असल्याची उत्तरे दिली जातात. शहरात दुरुस्तीच्या नावाखाली अनेकदा वीजपुरवठा बंद केला जातो. बुधवारी (दि. 19) दुपारी भरउन्हाळ्याच्या झळा ग्राहकांना बसत असताना एक ते तीन शहरातील सर्व वीजपुरवठा बंद राहील, असे महावितरणने कळवले होते, परंतु साडेचार वाजले तरी महावितरणकडून शहरातील वीजपुरवठा सुरू करण्यात आलेला नव्हता.
वयोवृद्ध नागरिक, लहान मुले, आईस्क्रीम व शीतपेय विक्रेते यांचे नुकसान झाले, परंतु सुस्त पडलेल्या महावितरणचे अधिकार्यांना त्याचे काही घेणे-देणे नाही. चार वाजता विचारपूस केली असता जेजुरीवरून होणारा पुरवठा बंद झाला असल्याचे दौंड महावितरण कार्यालयाकडून सांगण्यात आले, याबाबत दौंड महावितरणचे शहर उपअभियंता बशीरभाई देसाई यांना विचारले असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत, त्यामुळे दौंडकर नागरिक प्रचंड वैतागले आहेत.
महावितरण वसुलीच्या नावाखाली ग्राहकांना कायद्याचा बडगा दाखवते व वीजपुरवठा खंडित करतात, मग दररोज होणार्या ग्राहकांच्या नुकसानीला महावितरण जबाबदार आहे, त्यांनी ग्राहकांना त्याची भरपाई देणे गरजेचे आहे, सलग पाच तास वीजपुरवठा खंडित राहिला तर ग्राहकांना पाचशे रुपये देण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे, परंतु असे होताना मात्र दिसत नाही.
दोन शहरातील सर्वच पक्षाचे राजकीय नेते या विषयावर तोंड गप्प करून आहेत, याचे गोड बंगाल काय हे मात्र अनुत्तरीत आहे.
दिवसेंदिवस उष्णता वाढत आहे, त्यामुळे अनेकांचा जीव कासावीस होतो परंतु महावितरणच्या अधिकार्यांना त्याचे काही देणे-घेणे नाही, अशा या मुजोर महावितरणचे अधिकार्यांवर वरिष्ठ अधिकारी कारवाई का करत नाहीत हा प्रश्न आणि अनुत्तरीच आहे. येणार्या दिवसांमध्ये उष्णतेची लाट तीव्र होणार आहे, सतत जर असा वीजपुरवठा खंडित झाला तर याला जबाबदार असणार्या अधिकार्यांवर कारवाई व्हावी, अशी दौंडकरांची इच्छा आहे.