‘आरटीई’ वेबसाईट अजूनही हॅन्ग; पालकांना मन:स्ताप | पुढारी

‘आरटीई’ वेबसाईट अजूनही हॅन्ग; पालकांना मन:स्ताप

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : आरटीईची वेबसाईट गेली आठ दिवसांपासून हँग आहे. त्यामुळे पालकांना प्रवेशाचे मेसेज आले पण प्रवेश घेता येत नाहीत. शिक्षण प्रशासनाकडून वेबसाईटवर प्रचंड ताण असल्याने हँग होत असल्याचे सांगितले जात आहे. गेली आठ दिवसांपासून पालक वेबसाईट सुरू होण्याची वाट पाहत आहेत; मात्र पालकांच्या पदरी निराशा पडत आहे.

आरटीई प्रवेशासाठी 12 एप्रिलपासून पालकांना संदेश येत आहेत. गेली आठ दिवस सर्व पालक आरटीईचे संकेतस्थळ सुरू होण्याची वाट पाहत आहेत. संदेश आल्यानंतर त्यांना संकेतस्थळावर कागदपत्रे अपलोड करायची आहेत; मात्र तांत्रिक अडचणीमुळे पालकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या आठ दिवसांपासून संबंधित प्रशासनाला तांत्रिक अडचण दूर करता येत नाही. त्यामुळे प्रशासन आमच्या सहनशक्तीचा अंत पाहत आहेत का, असा प्रश्न पालक विचारत आहेत.

यामध्ये पालकांना पुरेसे इंटरनेटचे ज्ञान नाही.
संकेतस्थळ सुरू होण्यासाठी अजून किती वेळ वाट पहायची. त्यामुळे लवकरात लवकर संकेतस्थळ सुरू करावे, अशी मागणी पालक करत आहेत. याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.

शासनाने 12 एप्रिलपर्यंत मेसेज येतील आणि 25 तारखेपर्यंत कागदपत्र पडताळणी करायची आहे असे सांगितले. बहुतांश पालकांना मेसेजदेखील आले. पालकांना मेसेज गेले पण ऑनलाइन काही दिसत नाही अशी परिस्थिती आहे. तर दुसरीकडे पालकांना फोन येतात की लवकरात लवकर पडताळणी करून घ्या. वेबसाईट हँग असेल तर पालक काय करतील, अशा प्रकारे पालकांना वेठीस धरण्याचा प्रकार केला जात आहे.

                                 -हेमंत मोरे, अध्यक्ष, आरटीई पालक संघ

Back to top button