शिवसेनेच्या खासदारासह पाच नेते होते टार्गेट, एकतर्फी प्रेमातून मागायचा राजकीय नेत्यांकडे खंडणी | पुढारी

शिवसेनेच्या खासदारासह पाच नेते होते टार्गेट, एकतर्फी प्रेमातून मागायचा राजकीय नेत्यांकडे खंडणी

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राजकीय, प्रतिष्ठीत व्यावसायिकांना खंडणी मागणार्‍या आरोपीचे पुढील टार्गेट हे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले, साईनाथ बाबर हे असल्याचा प्रकार तपासात समोर आला. गुन्हे शाखेने एकाला वेळीच जेरबंद करून त्याचा डाव उधळून लावला. त्याच्याकडील चौकशीत आणि तांत्रिक विश्लेषणावरून हा प्रकार समोर आला आहे. दरम्यान त्याने हे कृत्य केवळ एका तरूणीला व तिच्या घरच्यांना त्रास देण्यासाठी केल्याचे समोर आले आहे.

शाहनवाज गाझीय खान (31, रा. मका मस्जिदजवळ, गरूवार पेठ सध्या रा. कोंढवा बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. यापूर्वी अशाच गुन्ह्यात इम्रान समीर शेख (37, रा. घोरपडीगाव) याला अटक करण्यात आली होती. शाहनवाज हा वेगवेगळ्या व्हॉट्सअ‍ॅप मॅरेज ब्युरो ग्रुपमध्ये सहभागी असून तो स्वतःच्या डीपीला महिलेचा फोटो लावुन ग्रुपमधील लोकांशी चॅटींग करीत असे. स्वतः महिला असल्याचे भासवून समोरच्या व्यक्तीकडून व्हॉटसअ‍ॅपचा ओटीपी मागून त्याचे व्हॉट्सअ‍ॅप तो हॅक करत होता. त्याच हॅककेलेल्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवरून तो राजकीय व्यक्तींना खंडणी मागत होता. अशा पध्दतीने माजी नगरसेवक दिपक मिसाळ, मनसे नेते वसंत मोरे यांचा मुलगा रूपेश, व्यावसायिक अनुज गोयल, माजी नगरसेवक अविनाश बागवे, आमदार महेश लांडगे यांना खंडणीच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णीक, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पाच पथके तयार करण्यात आली होती. खंडणी विरोधी पथक 2 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर,सहायक पोलिस निरीक्षक चांगदेव सजगणे, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव, अजय जाधव, अमंलदार विजय गुरव, विनोद साळुंके, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, राहुल उत्तरकर, सैदोबा भोजराव, सचिन अहिवळे, अमोल पिलाने, अय्याज दड्डीकर आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

तरूणीच्या कुटुंबातील व्यक्तींची बदनामी व्हावी व त्रास व्हावा यासाठी राजकीय आणि व्यावसायिक व्यक्तींच्या नावे त्याने 30 लाखांची खंडणी मागितली. दरम्यान, सर्वच गुन्ह्यात युऑन आयटी पार्क जवळ उभ्या असलेल्या संबंधित तरूणीच्या कारमध्ये खंडणीची रक्कम ठेवण्यास सांगून पोलिस त्यांच्याकडे चौकशी करतील आणि संबंधित तरूणीच्या घरच्यांना गुन्ह्यात सहभागी करून घेतील, हा आरोपीचा प्रयत्न होता.

युट्युबवरून मिळवली माहिती

पोलिसांना कसे सामोरे जायचे ? कसा बचाव करायचा ? व्हॉट्सअ‍ॅप कसे हॅक करायचे ? याचे प्रशिक्षण शाहनवाज याने युट्युबवरून घेतले होते. त्याच्याकडून गुन्ह्याच्या अनुषंगाने, स्क्रीन शॉट, बनावट मॅरेज सर्टीफिकेट, नामांकीत व्यक्तींची नावे त्याच्याकडील मोबाईल आणि लपवून ठेवलेल्या डीवाईसमधून सापडली आहेत.

Back to top button