उष्माघाताचा धोका वाढला..! | पुढारी

उष्माघाताचा धोका वाढला..!

बारामती : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याच्या सर्वच भागांसह बारामती व परिसरातील तापमान एप्रिलमध्येच 40 अंशांवर पोहचले आहे. तप्त उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. परिणामी, उष्माघाताचा धोका आता वाढला आहे. या उष्माघातापासून स्वत:चा बचाव करणे आपल्याच हाती आहे. आपला बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.

सध्या तीव— उन्हाने नागरिक हैराण झाले आहेत. सगळीकडेच वातावरण गरम आणि उष्ण आहे. दिवसेंदिवस उष्णता वाढत जात आहे. उन्हाळा येताना सोबत वेगवेगळ्या प्रकारचे आजार व शारीरिक समस्याही घेऊन येतो. वाढत्या उष्णतेमुळे आपल्याला डोकेदुखी, थकवा, डिहायड्रेशन, उष्माघात, त्वचेसंबंधी विविध आजार, अशा असंख्य समस्यांना सामोरे जावे लागते. पावसाळा सुरू होईपर्यंत रणरणत्या उन्हाने जीव हैराण होणे स्वाभाविक आहे. उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे अंगातून प्रचंड घाम येतो. ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होतो. कारण, घामाद्वारे शरीरातील पाण्यासोबत आवश्यक क्षार आणि मिनरल्स देखील कमी होतात. डिहायड्रेशनमुळे उष्माघाताचा फटका बसण्याची शक्यता असते. यापासून स्वतःचा बचाव करायचा असेल, तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

असा होतो उष्माघात…
इंडियन मेडिकल आसोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले की, आपल्या शरीराचे सरासरी तापमान 36.8 अंश सेल्सिअस इतके असते. त्याच्या वर किंवा खाली गेले, तरी शरीर आजारी पडू लागते व शरीर आपल्याला सिग्नल देते. सुरुवातीला सारखी तहान लागते. तेव्हा जर पुरेसे पाणी मिळाले नाही, की मग मोठा अनर्थ होऊ शकतो. सध्या शहराचे तापमान जरी 36 ते 37 अंशांवर असले, तरी वातावरणातला एकूण उष्मा जास्त असतो. तो मोजला जात नाही. तुम्हाला ऊन लागले, की डोके दुखते, मळमळ होऊन उलटी होते. मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा कमी होऊ लागतो. झटके येऊन बेशुद पडतो. श्वास थांबून हृदयाची धडधडही थांबू शकते.

काय करणे आवश्यक..?
भर उन्हात घराबाहेर पडू नये.
दुपारी घराबाहेर जाणे टाळावे.
जावे लागलेच तर छत्री, स्कार्फ, गॉगल आणि पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
नेहमी सैल आणि सुती कपडे वापरावेत.

किमान दोनवेळा अंघोळ करावी. यासाठी कोमट पाणी घ्यावे.

अति तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळून पचनास हलका आहार घ्यावा.
दिवसभरात मुबलक पाणी पिणे आवश्यक आहे.
उन्हाळ्यात व्यसनांपासून दूर राहा.

नेमके उन्हामुळे काय होते?
उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखरतेमुळे शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षार नष्ट होतात. उन्हाळ्यात सतत येणार्‍या घामामुळे शरीरातील पाण्याची पातळी खालावते.
मसालेदार पदार्थ पचनास जड असतात. या पदार्थांमुळे पचनसंस्थेवर ताण येतो. परिणामी, उन्हाळ्यात या पदार्थांचे सेवन केल्यास पित्त आणि अपचनाचा त्रास होतो.
उन्हाळ्यात घामाद्वारे शरीरातील पाणी, क्षार आणि मिनरल्स बाहेर निघून जातात. ज्यामुळे शरीरातील पाणीपातळी सतत कमी-जास्त होत असते.
उन्हाळ्यात मद्यपान आणि धूम—पान केल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते.
डिहायड्रेशन आणि व्यसनामुळे मूत्राशयावर ताण येऊ शकतो.
किडनीचे विकार होण्याचा धोका वाढतो.

Back to top button