धर्माच्या नावाखाली फसवणूक करणार्‍यांचा मुखवटा सर्वांसमोर आणा : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार | पुढारी

धर्माच्या नावाखाली फसवणूक करणार्‍यांचा मुखवटा सर्वांसमोर आणा : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार

देहूगाव : देवधर्माच्या नावाखाली काही लोक सर्वसामान्यांची फसवणूक करीत आहेत. अशा फसवणूक करणार्‍या लोकांचा खरा मुखवटा सर्वांच्या समोर आणायला हवा. सर्वच साधु-संतांची शिकवण कष्टकरी, दुर्बल लोकांपर्यंत मांडायला हवी. त्यामुळे समाजातील कटुता कमी होईल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी देहूगाव येथे केले. गाथा परिवारातर्फे देहूगाव येथे त्रैमासिक कीर्तन व प्रवचन प्रशिक्षण घेण्यात आले होते. त्या प्रशिक्षणाचा समारोप समारंभ मंगळवारी देहूगाव येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला, त्या प्रसंगी ते बोलत होते.

या वेळी उर्वरित वै. विकस मंडळाचे माजी अध्यक्ष, उल्हास पवार, आमदार सुनील शेळके, आमदार सत्यजीत तांबे, डॉ. सुधीर तांबे, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, माजी आमदार प्रकाश म्हस्के, भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद, देहूच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, माजी सरपंच कांतिलाल काळोखे, मधुकर कंद , भास्कर हांडे, श्याम सुंदर मिरजकर, हरिभाऊ गायकवाड आणि गाथा परिवाराचे पदाधिकारी उपस्थित होते.

कीर्तनसेवा अखंड सुरू ठेवा
या वेळी गाथा परिवाराचे संचालक उल्हास पाटील यांच्या हस्ते शरद पवार यांना तुकोबारायांची पगडी, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ तर चित्रकार सीताराम गायकवाड यांनी शरद पवार यांचे तयार केलेले शिल्प देऊन सन्मानित करण्यात आले. गाथा परिवारातर्फे कीर्तन आणि प्रवचन याचे प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण पूर्ण करणार्‍यांनी या वेळी कीर्तन व प्रवचनाचे सादरीकरण केले. ते पाहुन शरद पवार पुढे म्हणाले, की केवळ तीन महिन्यांचे प्रशिक्षण घेतले असूनही उत्तम प्रकारे मांडणी केली आहे. आता तुम्ही इथंच थांबायचे नाही, हे कार्य आता अखंडितपणे पुढे चालू राहिले पाहिजे, त्यादृष्टीने आपली पाऊले पुढे टाका. देहू, आळंदी आणि पंढरपूर हे संतांच्या विचारांची विद्यापीठ आहेत.

Back to top button