बालनाट्यांचा पडदा उघडला ! उन्हाळी सुट्यांमध्ये लहान मुलांसाठी रंगताहेत बालनाटकांचे प्रयोग

बालनाट्यांचा पडदा उघडला ! उन्हाळी सुट्यांमध्ये लहान मुलांसाठी रंगताहेत बालनाटकांचे प्रयोग

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आजी-आजोबांच्या धम्माल गोष्टी असो वा परीकथेची दुनिया… अशा वैविध्यपूर्ण विषयांवरील बालनाटकांची दुनिया लहान मुलांना अनुभवायला मिळत आहे. त्याचे कारण असे की, शाळांना सुट्या लागल्यामुळे बालरंगभूमीवर सुरू झालेले बालनाटकांचे प्रयोग. या प्रयोगांना हळूहळू पालकांसह लहान मुलांचा प्रतिसादही मिळत आहे. एप्रिल ते जून या कालावधीत महापालिकेच्या नाट्यगृहांसह खासगी नाट्यगृहांमध्ये प्रयोग होणार असून, प्रयोगांसाठी बुकिंगलाही सुरुवात झाली आहे. परंतु, असे असले तरी अजूनही नाट्य संस्था आर्थिक अडचणीत असल्यामुळे नवीन बाल नाटकांची निर्मिती झालेली नाही, त्यामुळे यंदा मुलांना जुनीच नाटके पाहावी लागणार असल्याचे चित्र आहे.

दीर्घकाळानंतर मुलांना उन्हाळ्याच्या सुटीत बालनाटके पाहायला मिळणार आहेत. सध्या नाट्यसंस्थांकडून बाल नाटकांचे प्रयोग टप्प्याटप्प्याने घेतले जात आहेत. संपूर्ण मे महिना बालनाटकांच्या प्रयोगांचा असणार आहे. त्यासाठी नाट्यगृहांतील तारखांचेही बुकिंग झाले आहे. नाट्यप्रयोगांशिवाय नाट्याभिवाचन, नाट्य कार्यशाळांनाही सुरुवात झाली आहे. बालरंगभूमी परिषदेचे प्रकाश पारखी म्हणाले की, लहान मुलांना उन्हाळ्याची सुटी लागल्याने बालनाटकांचे प्रयोग करायला आम्ही सुरुवात केली आहे. मे महिना तर प्रयोगांचाच असणार आहे. त्यादृष्टीने तयारीही झाली आहे. प्रयोगांच्या बुकिंगलाही सुरुवात झाली आहे.

पुढील आठवड्यापासून आणखी काही शाळांना सुट्या लागणार असल्याने प्रयोगांना चांगला प्रतिसाद मिळेल, असा अंदाज आहे. नाट्य कलाकार संतोष माकुडे म्हणाले की, आम्ही काही बालनाटकांचे प्रयोग आयोजित केले आहेत. विविध शाळांमधील लहान मुले नाटकांमध्ये काम करीत असून, त्यांच्यात कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. संपूर्ण मे महिना बालनाटकांचा असणार आहे. परंतु, यंदाच्या वर्षी मुलांना नवीन नाटकांऐवजी जुनीच नाटके पाहायला मिळतील. नवीन नाट्यनिर्मिती यंदा फारसी झालेली नाही. 15 एप्रिलपासून नाटकांच्या प्रयोगांना सुरुवात झाली आहे.

शिबिरांसाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंग
यंदा मुलांना नाट्य शिबिरांसह बालनाटकांमध्येही काम करता येणार आहे. त्यासाठीची तयारी मुलांनी सुरू केली आहे. शाळेला उन्हाळ्याची सुटी लागल्यानंतर मुले प्रयोगांसह शिबिरातही सहभागी होणार आहेत. शिबिरांसाठीचे अ‍ॅडव्हान्स बुकिंगही सुरू झाले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news