जाण्यापूर्वी त्यांनी दिले तीन आयुष्यांना जीवनदान ! | पुढारी

जाण्यापूर्वी त्यांनी दिले तीन आयुष्यांना जीवनदान !

धायरी : पुढारी वृत्तसेवा : अपघातात जखमी झालेल्या एका 52 वर्षीय महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, महिला ब्रेनडेड झाल्याने कुटुंबीयांनी त्यांचे मरणोत्तर अवयवदान केले, त्यामुळे समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी केलेले हे दान अमूल्य असून, यामुळे 3 रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. सिंहगड रोड परिसरात राहणार्‍या सीताबाई रमेश भोसले (वय 52) येथील बेनकरवस्तीत खानावळ चालवत होत्या. तसेच त्या एका खासगी कंपनीत कामालाही होत्या. कामावर जाताना धायरी-नर्‍हे रस्त्यावर दुचाकीवरून पडल्याने त्या गंभीर जमखी झाल्या होत्या.

सह्याद्री रुग्णालयात त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते. उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले. त्यानंतरे सामाजिक चळवळीत काम करणारे त्यांचे बंधू विक्रम कसबे व त्यांच्या नातेवाइकांनी सीताबाई यांच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. डोळे, यकृत व दोन किडन्या दान करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. सीताबाई यांच्या पश्चात पती, दोन मुली व एक मुलगा आहे. दरम्यान, या अवयवांपैकी एक किडनी पुण्यातील एका खासगी रुग्णालयातील एका रुग्णावर, तर दुसरी किडनी आणि यकृत सह्याद्री रुग्णालयातील दोन रुग्णांवर प्रत्यारोपित केल्याची माहिती महिलेच्या कुटुंबीयांनी दिली.

Back to top button