येरवडा : पुढारी वृत्तसेवा : लोहगाव-वाघोली मुख्य रस्ता कटरच्या साहाय्याने मधोमध तोडून त्यामध्ये केबल टाकली जात आहे. ठेकेदाराकडून मध्यरात्री हा प्रकार सुरू असून, याबाबत महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग अनभिज्ञ आहे. अटी व नियमांना हरताळ फासून हे काम केले जात असून, संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणी नागरिक व कर्मभूमी प्रतिष्ठानने पथ विभागाकडे केली आहे. या रस्त्यावर नियमबाह्य खोदाईचा प्रकार दै. 'पुढारी'ने काही दिवसांपूर्वी उघडकीस आणला होता. त्यानंतर आता पुन्हा एका ठेकेदाराकडून मध्यरात्री पाच जी केबल टाकण्याचे काम केले जात आहे.
मंगळवारी पहाटे कर्मभूमीनगरजवळ केबल रस्त्याच्या मधोमध टाकली आहे. वास्तविक केबल रस्त्याच्या कडेने टाकणे आवश्यक होते. महापालिकेच्या नियम व अटींचे उल्लघंन करीत ही केबल टाकली आहे. नागरिकांनी विचारपूस केल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या कामगारांनी पळ काढला. सुपरवायजरदेखील जुजबी उत्तर दिली. रस्ता मधोमध खोदून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी ठेकेदार व संबंधित अधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा; आंदोलन करण्याचा इशारा प्रतिष्ठानच्या वतीने सुनील खांदवे, मोहन शिंदे यांनी दिला आहे.