भूमिपुत्रांच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू..! खडकवासला धरण भागातील ओसाड जमिनी बहरल्या | पुढारी

भूमिपुत्रांच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू..! खडकवासला धरण भागातील ओसाड जमिनी बहरल्या

खडकवासला : 12 जुलै 1961 रोजी पानशेत धरण फुटल्याने आलेल्या महाभयंकर प्रलयात उद्ध्वस्त झालेल्या धरण तीरावरील नापीक जमिनी, तसेच ओसाड माळराने आता फळबागा, पिकांनी बहरू लागले आहेत. खडकवासला धरणातील गाळ मातीने या जमिनी पुन्हा हिरवाईने फुलल्याने परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसह भूमिपुत्रांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळू लागले आहे. खडकवासला धरणाच्या तीरांवरील कुरण बुद्रुक, गोर्‍हे बुद्रुक, गोर्‍हे खुर्द, खानापूर, जांभली आदी गावांतील भूमिपुत्रांना वर्षभर काबाडकष्ट करूनही तुटपुंजे उत्पन्न मिळत होते.

खडकवासला धरणातून काढलेला गाळ, माती परिसरात पडीक, नापीक जमिनीत टाकल्याने या ठिकाणी आता बारमाही फळबागांसह विविध पिकांचे उत्पन्न मिळू लागले आहे. निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी ग्रीन थंब संस्थेच्या माध्यमातून खडकवासला धरणातील पाणीसाठा वाढण्यासाठी लोकसहभागातून बारा वर्षांपूर्वी खडकवासला धरण पुनर्जीवन प्रकल्पाचे काम सुरू केले. अनेक वर्षांपासून धरणात साठलेला गाळ-माती काढून मोफत स्थानिक शेतकर्‍यांच्या ओसाड जमिनीत टाकली जात आहे. यामुळे 25 किलोमीटर लांबीची वनराई बहरली आहे. गाळ मातीवर प्रथमच पिकांचे भरघोस उत्पादन मिळाल्याने गोर्‍हे बुद्रुक येथील शेतकरी रामचंद्र नानगुडे हे भावनाविवश झाले.

पानशेत धरण फुटले त्या वेळी कुरण बुद्रुक गावातील बहुतांश शेतातील माती वाहून गेली. केवळ खडक, वाळूच शिल्लक राहिली होती. या ठिकाणी धरणातील माती टोकल्याने सुमारे शंभर एकर पडीक, नापीक जमिनीत आता फळबागांसह विविध पिकांतून चांगले उत्पन्न मिळत आहे.
                                                   – रवींद्र कडू, शेतकरी, कुरण बुद्रुक

 

Back to top button