पुणे : कुकडी प्रकल्पाचे फेर जलनियोजन होणार | पुढारी

पुणे : कुकडी प्रकल्पाचे फेर जलनियोजन होणार

शिवाजी शिंदे :

पुणे :  कुकडी प्रकल्पातील विविध कामांसाठी आता 5 हजार 500 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता घेण्यात येणार आहे. त्यानुसार डिंभे-माणिकडोह प्रकल्पातील बोगदा, कुकडीच्या डाव्या कालव्याची दुरुस्ती यासह फेर जलनियोजन करण्यात येणार आहे. यासाठी नवीन सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) घेण्यात येणार आहे. त्यानुसारच या प्रकल्पातील कामे होणार आहेत. हा सुधारित अहवाल लवकरच राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. कुकडी प्रकल्पाअंतर्गत डिंभे, माणिकडोह, येडगाव, वडज, पिंपळगाव जोगे ही पाच धरणे समाविष्ठ आहेत.

या पाचही धरणांचा सुमारे 29.67 टीएमसी (अब्ज घनफूट) उपयुक्त पाणीसाठा आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पुणे, नगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या पाच तालुक्यातील सुमारे 1 लाख 24 हजार हेक्टर क्षेत्र लाभार्थी आहे. त्याचबरोबर या भागातील नागरिकांना पिण्यासाठी पाणीदेखील याच प्रकल्पामधून देण्यात येते. कुकडीसाठी 2018 मध्ये तिसरी सुधारित मान्यता घेण्यात आली होती. त्यानुसार 3 हजार 900 कोटींची कामे सुचविण्यात आली होती. मात्र, हे नियोजन मागे पडले आणि फेब—ुवारी महिन्यात राज्याचे जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर कुकडी प्रकल्प मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. यात या प्रकल्पसाठी चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता अहवाल तयार करण्याचा सूचना देण्यात आल्या.

चतुर्थ सुप्रमाची किंमत 5 हजार 500 कोटी आहे. त्यानुसार डिंभे-माणिकडोह बोगद्याचे काम नव्याने अंतर्भूत करण्यात आले आहे. त्याचा खर्च अंदाजे 350 कोटी आहे. तसेच कुकडी डावा-कालवा दुरुस्तीसाठी 150 कोटीची तरतूद नव्याने करण्यात आली आहे.

Back to top button