पीएमपीला पीएमआरडीएमध्ये हवा बिझनेस प्लॅन ; प्रवासी सेवेचा नव्याने आराखडा तयार करण्याची पुणेकरांची मागणी | पुढारी

पीएमपीला पीएमआरडीएमध्ये हवा बिझनेस प्लॅन ; प्रवासी सेवेचा नव्याने आराखडा तयार करण्याची पुणेकरांची मागणी

प्रसाद जगताप : 

पुणे : पीएमपीच्या संचालक मंडळात पीएमआरडीए आयुक्तांचा समावेश झाल्यामुळे या भागात सेवा पुरविण्यासाठी पीएमपीला अधिकृतरीत्या ग्रीन सिग्नल मिळाला आहे. मात्र, केवळ पुणे-पिंपरी महापालिकांच्या हद्दीतील लोकसंख्येसाठी निकषांनुसार आवश्यक असणार्‍या बसगाड्यांची संख्या आधीच गरजेपेक्षा किमान दीड हजारांनी कमी असताना पीएमआरडीएच्या तब्बल आठशे गावांतील जादा लोकसंख्येसाठी बसगाड्यांची संख्या कशी पुरणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे दोन्ही महापालिकांसह संपूर्ण पीएमआरडीएसाठी नव्याने आराखडा करण्याची गरज आहे.

पुणे आणि पिंपरी महापालिकांच्या हद्दीतील लोकसंख्येनुसार एक लाख लोकसंख्येला 55 बसगाड्या असे प्रमाण सर्वंकष वाहतूक आराखड्यात निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार पीएमपीला सध्याच किमान साडेतीन हजार बसगाड्यांची गरज असताना केवळ 2049 बसगाड्या उपलब्ध होत आहेत. याचाच अर्थ किमान दीड हजार गाड्यांची उणीव जाणवते आहे. असे असताना आता महापालिकांच्या हद्दीबाहेरच्या आठशे गावांमध्येही पीएमपीची सेवा पुरवण्याचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे संपूर्ण पीएमआरडी एसाठी किती गाड्या लागणार, याचा अभ्यास करून आराखडा करण्याची गरज स्पष्ट झाली आहे. याखेरीज या भागात आवश्यक त्या पायाभूत सुविधाही अद्याप उपलब्ध नाहीत. तसेच बसगाड्यांची वारंवारिता, फेर्‍या, बसथांबे, बसस्थानके, डेपो आणि वेळेचे नियोजनसुद्धा आवश्यकतेप्रमाणे नाही.

पीएमपीला दिवसभरातील सेवेपैकी 24 टक्के सेवा पीएमआरडीए भागात पुरवावी लागत आहे. त्यामुळे पीएमपीला या भागात 187 कोटींचा तोटा होत आहे. मात्र, हा तोटा आता पीएमआरडीए प्रशासन संचलन तूट म्हणून देणार असल्याची चर्चा आहे. परंतु, असे
असले तरी पीएमपीला पुणेकर प्रवाशांप्रमाणेच आता पीएमआरडीए भागातील प्रवाशांनासुध्दा चांगली आणि उत्तम दर्जाची सेवा पुरवावी लागणार आहे. त्याकरिता पीएमआरडीए भागात पीएमआरडीए आणि पीएमपी प्रशासनाने प्रवाशांकरिता पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

या पायाभूत सुविधा हव्यात
ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण होईल
असे बसस्थानक, डेपो, थांबे.
प्रत्येक ठिकाणी स्वच्छतागृहांची सुविधा.
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.
बसस्थानकांवर प्रशस्त प्रतीक्षालये.
पीएमआरडीए भागात पास केंद्रांची व्यवस्था.
प्रवाशांना वेळेत बस मिळाव्यात, त्याची
माहिती मिळावी, यासाठी मार्गदर्शक.
बसथांब्यांवर बसमार्ग, वेळेची माहिती मिळावी.

पीएमआरडीए भागातील प्रवाशांना आम्ही चांगली आणि उत्तम दर्जाची सेवा देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. त्यासंदर्भातील नियोजन करण्याचे काम सुरू आहे. या भागात बसस्थानक, थांबे आणि डेपोंसाठी जागा मिळावी, याकरिता आम्ही पीएमआरडीए प्रशासनाला मागणी केली आहे.
                       – सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल

 

Back to top button