पुणे : दहशतवादी कृत्याचे प्रशिक्षण दिल्या गेलेल्या ‘त्या’ शाळेची परवानगी बोगस | पुढारी

पुणे : दहशतवादी कृत्याचे प्रशिक्षण दिल्या गेलेल्या 'त्या' शाळेची परवानगी बोगस

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील शाळेच्या इमारतीत दहशतवादी कृत्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे प्रकरण उघड होताच शिक्षण विभागासह अनेक शाळा खडबडून जाग्या झाल्या. शिक्षण विभागाने केलेल्या तपासणीत ती शाळा बोगस असून, शिक्षण उपसंचालकांच्या बनावट स्वाक्षरीने प्रमाणपत्र ठेवण्यात आल्याचे उघड झाले आहे. विभागीय उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडे तसा अहवाल पाठविला असल्याचे समजते.

राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ने रविवारी पुण्यातील ब्ल्यू बेल्स शाळेच्या इमारतीचे दोन मजले दहशतवादी कृत्यांसाठी वापरले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर 20 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करून इमारत सील केली होती. सदर ब्ल्यू बेल्स शाळा अनधिकृतपणे चालवली जात होती. एनआयए कारवाईनंतर शिक्षण विभागाने एक पथक चौकशीसाठी पाठवले. पथकाने कागदपत्रांसह शाळेच्या मान्यतेचे प्रमाणपत्र दाखवण्याचे आदेश दिले. शाळा प्रशासनाने तत्कालीन शिक्षण उपसंचालक अहिरे यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र दाखवले. पथकाने त्या प्रमाणपत्रावर असलेल्या आउटवर्ड क्रमांक व स्वाक्षरीची शंका आल्याने कार्यालयात तपासण्याची सूचना केली. तत्कालीन शिक्षण उपसंचालक अहिरे यांनी असे प्रमाणपत्र जारी केलेले नसल्याचे सांगण्यात आले.

Back to top button