ठिकेकरवाडीला एक कोटीचे बक्षीस; ‘राष्ट्रीय पंचायत’ पुरस्काराचे दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण | पुढारी

ठिकेकरवाडीला एक कोटीचे बक्षीस; ‘राष्ट्रीय पंचायत’ पुरस्काराचे दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण

ओतूर; पुढारी वृत्तसेवा : ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2023’, ‘ऊर्जा स्वराज विशेष पंचायत विकास’ पुरस्कारासाठी जुन्नर तालुक्यातील ठिकेकरवाडी गावाची निवड करण्यात आली होती. नवी दिल्लीत झालेल्या दिमाखदार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. एक कोटी रुपये व सन्मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ठिकेकरवाडीचे सरपंच संतोष ठिकेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

त्या वेळी ग्रामविकास अधिकारी अस्लम शेख व गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते. या प्रसंगी केंद्रीय पंचायतराज व ग्रामविकासमंत्री गिरिराज सिंग, राज्यमंत्री कपिल पाटील, राज्यमंत्री फगन्नसिंग कुलस्ते, मुख्य सचिव सुनील कुमार आदी या वेळी उपस्थित होते. आतापर्यंत गावाला असंख्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान सर्वोच्च असल्याची प्रतिक्रिया सरपंच संतोष ठिकेकर व ग्रामस्थांनी दिली.

देशभरातील प्रत्येक राज्याने तालुका, जिल्हा विभाग व राज्यपातळीवर स्पर्धा घेऊन राज्यातील तीन ग्रामपंचायतींची प्रत्येक राज्याने निवड करून केंद्र प्रशासनाच्या पंचायतराज मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यातून देशातील तीन ग्रामपचायतींची निवड करण्यात आली. ठिकेकरवाडी (ता. जुन्नर, जि. पुणे) प्रथम; अनुकुली, ओडिशाला द्वितीय, तर मुकरा, तेलंगणला तृतीय पुरस्कार मिळाला.

गत 12 वर्षांपासून ठिकेकरवाडी गावाने सातत्याने अपारंपरिक ऊर्जाक्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने प्रयत्न केले. सरपंच, ग्रामसेवक यांनी ग्रामस्थांसोबत योग्य तो समन्वय साधला. ग्रामस्थांनी दिलेल्या साथीमुळे या पुरस्कारासाठी गावची निवड झाली. संतोष ठिकेकर, सरपंच

 

Back to top button