मार्केट यार्डातील पाणपोई पाण्याअभावी कोरडी अन् नळाची चोरी | पुढारी

मार्केट यार्डातील पाणपोई पाण्याअभावी कोरडी अन् नळाची चोरी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उन्हाच्या कडाक्यात तहान भागविण्यासाठी बाजार समितीने बसविलेल्या पाणपोई पाण्याअभावी कोरड्या पडल्या आहेत. येथील बहुतांश पाणपोईंचे नळच चोरीला गेले असून, पाणीच नसल्याने बाजारात खरेदीसाठी आलेल्यांसह बाजारघटकांना तहान भागवणे कठीण झाले आहे. दुपारच्या सुमारास तहानलेले नागरिक मोठ्या आशेने पाणपोईपर्यंत येतात, मात्र पाणी न मिळाल्याने निराश होऊन माघारी फिरत आहेत.

गुलटेकडी मार्केट यार्डातील गूळ-भुसार बाजारात विविध प्रकारची 650 दुकाने आहेत. बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांसह बाजारघटकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध ठिकाणी पक्क्या स्वरूपाच्या पाणपोई उभारल्या आहेत. पावसाळा आणि हिवाळ्यात जरी या पाणपोईकडे कुणी वळून पाहत नसले, तरी उन्हाळ्यात मात्र बाजारघटकांना पाणपोईशिवाय पर्याय नसतो. महागड्या पाण्याच्या बाटलीपेक्षा पाणपोई हा एकच स्त्रोत बाजारघटकांसाठी सोयीचा आहे. मात्र, या पाणपोईमध्ये पाणी उपलब्ध करून देण्याकडेच प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

उन्हाळाच्या पार्श्वभूमीवर बाजारातील या पाणपोईंची एक-दोन महिने आधीच दुरुस्ती करणे गरजेचे होते. परंतु, प्रशासनाने त्याकडे पूर्णपणे डोळेझाक केली. परिणामी, बाजारात बहुतांश पाणपोई कोरड्या ठाक पडल्या असून, येथील नळही चोरीला गेले आहेत. त्याठिकाणी प्लॅस्टिकचे बोळे कोंबण्यात आले आहे. एप्रिल महिन्यात उन्हाने जिवाची काहिली होत असताना पाणपोई कोरड्या राहात असतील, तर तहान कशी भागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही ठिकाणी पाणपोईची सार्वजनिक मुतारी झाल्याची गंभीर परिस्थिती आहे.

निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रशासनाचे दुर्लक्ष
बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या पूर्वीच ही कामे होणे अपेक्षित होते. मात्र, ती झाली नाहीत. बाजारातील छोट्या-छोट्या समस्यांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची खंत मार्केट यार्डातील काही व्यापारी व कामगारांनी बोलून दाखविली.

Back to top button