पुणे जिल्हा परिषदेच्या पदभरतीसाठी ‘आयबीपीएस’शी करार; भरतीचा मार्ग मोकळा | पुढारी

पुणे जिल्हा परिषदेच्या पदभरतीसाठी ‘आयबीपीएस’शी करार; भरतीचा मार्ग मोकळा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भरतीसाठी परीक्षा घेण्याबरोबरच प्रक्रियेची कार्यवाही करण्यासाठी आयबीपीएस (इंडियन बँकिंग पर्सनल सिलेक्शन) संस्थेची नियुक्ती शासनाकडून झाली आहे. त्यावर पुणे जिल्हा परिषद आणि या संस्थेमध्ये झालेल्या करारावर सोमवारी (दि.17) स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. परिणामी, वर्षभरापासून रेंगाळलेल्या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हा परिषदेने आयबीपीएस संस्थेला परीक्षा घेण्याचे काम देण्याचे निश्चित करून संस्थेचे प्रतिनिधी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यात संयुक्त करार करण्यात आला. नोकर भरतीसाठी परीक्षा एजन्सी नेमणे, तिला कामे ठरवून देणे याचा निर्णय होत नव्हता.

राज्य शासनाने सर्व जिल्हा परिषदांना टीसीएस म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस आणि आयबीपीएस या दोन संस्थांपैकी कोणत्याही एका संस्थेची निवड करण्यासंदर्भातील सूचना दिल्या होत्या. जिल्हा परिषदेने नियुक्त केलेल्या आयबीपीएस या संस्थेकडे प्रामुख्याने नोकर भरतीसाठी घ्यावयाची परीक्षा त्याचे नियोजन करणे, प्रश्नपत्रिका काढणे, कच्चा निकाल तयार करणे त्याचबरोबर कॉल सेंटर या बाबी करावयाच्या आहेत.

Back to top button