पुणे: अतिक्रमण कारवाईविरोधात सदाभाऊ खोतांचे आंदोलन, महापालिकेच्या बाहेर कांदा विकून केला निषेध | पुढारी

पुणे: अतिक्रमण कारवाईविरोधात सदाभाऊ खोतांचे आंदोलन, महापालिकेच्या बाहेर कांदा विकून केला निषेध

पुणे, पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करून जप्त केलेला शेकतर्‍याचा कांदा विक्रीचा टेम्पो सोडावा, तसेच संबंधीत अधिकार्‍यावर कारवाई करावी, या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक व माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी महापालिकेसमोर आंदोलन केले. यावेळी त्यांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावर कांदा विकून प्रशासनाचा निषेध केला.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पुणे-सोलापूर रस्त्यावर हडपसर येथे रस्त्याच्या कडेला कांदा विक्री करणार्‍या टेम्पोवर कारवाई केली. कारवाईनंतर त्याला 40 हजार रूपयांचा दंड लावण्यात आला. टेम्पो सोडविण्यासाठी संबंधित शेतकर्‍याला गेले आठ दिवस पळविले जात आहे, असा आरोप करत खोत यांच्या संघटनेने शनिवारवाडा ते महापालिका भवन असा मोर्चा काढून महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. या आंदोलनात खोत यांच्यासह त्यांच्या संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. यावेळी खोत यांनी प्रवेशद्वारावरच कांदा विक्री केला. त्यानंतर खोत व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गेटवरून उड्या मारत महापालिका भवनाच्या परिसरात प्रवेश केला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पालिका प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.

आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी गरीब शेतकरी शहरात येऊन शेतीमाल विक्री करतात. मात्र, महापालिका त्यांच्यावर अन्यायकारक कारवाई करते. बार्शी तालुक्यातील शेतकरी रमेश आरगडे हे हडपसर येथे कांदा विक्री करताना त्यांच्यावर कारवाई करून 40 हजार रुपये दंड केला. अशा प्रकारे अन्यायकारक कारवाई करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी, तेसच कोणताही दंड न करता आरगडे यांचा कांदा व टेम्पो सोडण्यात यावा.
– सदाभाऊ खोत, माजी राज्यमंत्री.

शेतकर्‍यांनी आपला माल शहरात विक्री करावा, अशी आमचीही भूमिका आहे. यासाठी आम्ही शहरात विविध ठिकाणी जागा उपलब्ध करून देणार आहोत. या ठिकाणांची यादी आम्ही जाहीर करू. मात्र, वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने शेतकर्‍यांनी रस्त्याच्या कडेला माल विक्री करू नये.
– विक्रम कुमार, महापालिका आयुक्त.

Back to top button