लोणावळा : लोणावळा शहरात सातत्याने होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी अवजड व मोठ्या 6 चाकी वाहनांना लोणावळा शहरातून प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. लोणावळा उपविभागाचे सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या अध्यक्षतेखाली लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात पावसाळ्यात याठिकाणी सातत्याने होणार्या वाहतूककोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात अधिकार्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत लोणावळा शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तसेच लोणावळा नगर परिषद, आयएनएस शिवाजी, एमएसआरडीसी, आयआरबी, वन विभाग, रेल्वे विभाग यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. .
रस्ता दुभाजकांचे काम पूर्ण करण्यात येणार
यात शहरातील महत्वाच्या व गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे व त्याकरीता दोन कंट्रोलरूम बनविणे, कॅमेर्यासोबतच या ठिकाणी सूचना देण्यासाठी व वाहतूक नियमनासाठी पीए सिस्टीम बसविणे, राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या मध्यभागी असलेले रस्ता दुभाजकांचे काम पूर्ण करून त्यास रंग देणे तसेच रात्रीच्यावेळी दिसण्यासाठी रिफलेक्टर लावणे, रेल्वे व वन विभागाची जागा पार्किंग करता उपलब्ध करून घेणे, एमएसआरडीसीकडून रस्त्यांची डागडुजी करून घेणे आणि लोणावळा नगर परिषदेच्या मालकीच्या मोकळया जागेवर पार्किंगची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, यासंदर्भात पुढील आढावा बैठक लोणावळा नगर परिषदेत 18 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.
अतिक्रमण काढण्याचा निर्णय
याशिवाय पुणे-मुंबई जुन्या हायवेवर अवजड व मोठया 6 चाकी वाहनांना लोणावळा शहरातून प्रवेश मनाई करणे, मुख्य रोडवरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पर्यायी मार्गाचा पाहणी करून त्या वापरात आणणे तसेच आयएनएस शिवाजी यांच्याकडील पर्यायी मार्ग उपलब्ध करुन घेणे, लोणावळा शहरातील मुख्य व गर्दीचे ठिकाणी वाहतूक नियमानासाठी ट्रॅफिक सिग्नल कार्यान्वित करणे, मुख्य रोडलगत तसेच पर्यटन स्थळ परिसरातील अतिक्रमण काढून टाकणे, टोईंग व्हॅन उपलब्ध करणे, वाहतूक नियोजनासाठी पोलिस मित्र व एनएसएस यांची मदत घेणे, पथारी, हातगाडया वाले यांना पर्यायी जागा उपलब्ध करुन देणे, पार्किंग दिशा दर्शविणारे बोर्ड लावण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.