आळंदी : पुढारी वृत्तसेवा : चैत्र वारी अर्थात वरुधिनी एकादशीनिमित्त रविवारी (दि. 16) लाखो भाविक संत ज्ञानेश्वर
महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आळंदीत दाखल झाले होते. मंदिर परिसरात सकाळपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. त्यामुळे दर्शनबारी क्षमतेने कमी पडली. उन्हात ताटकळत उभ्या असलेल्या भाविकांच्या यू-आकारात रांगा करत नियोजन करण्याची वेळ व्यवस्थापनावर आली. मंदिरातील दर्शनबारीत केवळ दीड ते दोन हजार भाविक सामावू शकतात, त्यामुळे नदीपलीकडे भव्य दर्शनबारी उभारणे गरजेचे आहे.
आळंदीत माउलींच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांना सध्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दर्शनबारीच्या जागेचा प्रश्न सुटला नसल्याने भाविकांना उन्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे आळंदी नगरपालिका व देवस्थान भाविकांच्या सोयीसुविधांसाठी व्यापक धोरण राबवणार तरी कधी? असा प्रश्न वारक-यांनी उपस्थित केला आहे. महाद्वारासमोर चप्पल स्टॅण्ड नसल्याने नागरिक तेथेच चप्पल सोडून दर्शनासाठी जात होते, त्यामुळे महाद्वारासमोर चपलांचे ढीग लागले होते. आळंदी देवस्थानतर्फे हनुमान दरवाजात स्टॅण्ड उभारले आहे. मात्र, त्या बाजूने येणा-या भाविकांची संख्या कमी आहे.
जागा उपलब्ध नसल्याने चप्पल स्टॅण्ड महाद्वारात उपलब्ध करू शकत नाही. नगरपालिकेने चप्पल स्टॅण्डसाठी जागा देऊ केल्यास महाद्वारात चप्पल स्टॅण्ड उभारण्यात येईल. महाद्वारात चप्पल काढू नये, अशा सूचना स्वच्छता कर्मचार्यांकडून भाविकांना केल्या जात असतात. दर्शनबारीसाठी जागेची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
– ज्ञानेश्वर वीर, प्रमुख व्यवस्थापक, आळंदी देवस्थानमहाद्वारात चपल स्टॅण्ड उभारण्याबाबत दोन दिवसांत पाहणी करून काय उपाययोजना करता येईल, याची माहिती घेण्यात येईल. त्यानुसार निर्णय घेऊ. दर्शनबारी जागेबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे.
– कैलास केंद्रे, मुख्याधिकारी, आळंदी नगरपालिका
..