

पुणे : पुढारी वृत्तसेवा : तरुणपणी बास्केटबॉल खेळताना पुण्याच्या विशाल ढवळेला गुडघ्याला झालेली दुखापत… त्यानंतर केलेली शस्त्रक्रिया… सायकलिंगपासूनच पुन्हा केलेली सुरुवात आणि 51 व्या वर्षी मिळालेला आर्यनमॅनचा किताब. हा त्याचा प्रवास अनेकांना प्रेरणा देत आहे. विशाल ढवळे याचे पुण्यात बालपण आणि तरुणपण गेले. शाळेत असताना विशालने जिम्नॅस्टिक्स, मल्लखांब तसेच फुटबॉल खेळण्यात प्रावीण्य मिळवले. आंतरशालेय क्रिकेट स्पर्धांतून त्याने आपली चमक दाखविली. नंतर काही वर्षे त्याला बास्केटबॉल खेळण्याची संधी मिळाली. टाटा मोटर्स या कंपनीत कार्यरत असताना तो आंतर-औद्योगिक स्पर्धासुद्धा खेळला.
विशालला 2002 साली बास्केटबॉल खेळताना दुखापत झाली आणि उजव्या गुडघ्याची लिगामेंट्स 3 ठिकाणी तुटली. त्या वेळी डॉक्टरांनी ए सी एल रिकन्स्ट्रक्शन ही शस्त्रक्रियादेखील केली. पण मेनिस्कसवरील उपचार करण्याचे राहून गेले. सध्या त्याला पी सी एल लॅक्सिटीचा त्रास होतोय. या सगळ्या पार्श्ववभूमीवर काही मित्रांसोबत सायकलिंगचा सराव सुरू केला. फुल आयर्नमॅन – यात 3.8 कि.मी पोहणे, 180 कि.मी सायकलिंग आणि 42.2 कि.मी धावणे असते. अखेरीस 2 तास 35 मिनिट 5 सेकंदांत 21.1 किलोमीटर्स धावून आयर्नमॅन – 70.3 हे आव्हान पूर्ण केले. आपल्या यशाचे श्रेय आयर्नमॅनसाठी उद्युक्त करणारे गुरू सुनील देशपांडे आणि मुरुगेश यांना देतो. डॉ. प्रसाद जोशी, डॉ. योगेश पंचवाघ आणि डॉ. श्रीराम आठल्ये यांनी सहकार्य केल्याचे विशाल ढवळे यांनी सांगितले.