

नवी सांगवी; पुढारी वृत्तसेवा : माहेश्वरी चौक येथील महापालिकेच्या अहल्याबाई होळकर दशक्रिया विधी घाट येथे गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तसेच वादळी वार्यामुळे सुरक्षा भिंतींवरील लोखंडी बार, पत्रे निखळून पडले आहेत. सुरक्षा भिंतींवर लावण्यात आलेले लोखंडी बार व पत्रे येथे येणार्या नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. ये-जा करताना एखाद्याच्या अंगावर पडून अपघात घडून येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लोखंडी बार गेले गंजून
नवी सांगवी येथील माहेश्वरी चौकात पवनानदी किनारी महापालिकेचे अहल्याबाई होळकर दशक्रिया विधी घाट आहे. याला लागूनच महापालिकेचे कचरा निर्मूलन संकलन केंद्र आहे. या दोघांमध्ये सुरक्षा भिंत उभारण्यात आली आहे. या सुरक्षा भिंतींवर लोखंडी बार उभारून पत्रे लावण्यात आले आहे. ज्या लोखंडी बारवर पत्रे लावलेले आहेत, ते पूर्णपणे गंजून गेले असून त्याची दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच हे पत्रे तुटून पडले आहेत.
अपघाताची भीती
गुरुवारी रात्री अचानक सुसाट वादळी वार्यासह मुसळधार पावसामुळे सुरक्षा भिंतींवर लावण्यात आलेले लोखंडी बार व पत्रे निखळून धोकादायक अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडून अनर्थ होऊ शकतो. जुनी सांगवी, नवी सांगवी परिसरातील नागरिक येथील घाटावर दशक्रिया विधी करण्यासाठी मोठया संख्येने येत असतात. या वेळी आप्तेष्ट, नातेवाईक, मित्र परिवार, महिला येत असतात. या वेळी ये-जा करताना येथील धोकादायक लोखंडी बार व पत्रे एखाद्याच्या अंगावर पडून अपघात घडून येऊ शकतो.
महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष न करता निखळून पडलेले लोखंडी बार व पत्रे काढून टाकण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून
होत आहे.