पिंपरी : आनंदाचा शिधाचे 45 टक्केच वाटप; मुदत संपल्यानंतरही वाटप अपूर्णच | पुढारी

पिंपरी : आनंदाचा शिधाचे 45 टक्केच वाटप; मुदत संपल्यानंतरही वाटप अपूर्णच

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने गुढीपाडव्यापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या कालावधीत वाटपासाठी जाहीर केलेल्या आनंदाचा शिधाचे आत्तापर्यंत 45 टक्केच वाटप पूर्ण झाले आहे. म्हणजे या योजनेतील धान्य वाटपासाठी दिलेली मुदत संपल्यानंतरही वाटप अपूर्णच आहे. त्यामुळे डॉ. आंबेडकर जयंतीनंतरदेखील हे वाटप सुरुच राहणार आहे.

शहरात नोंदणीकृत 248 स्वस्त धान्य दुकाने
शहरामध्ये एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही स्वस्त धान्य दुकानांमध्ये आनंदाचा शिधाचे वाटप सुरू झाले होते. त्यानंतर, हळूहळू शहरातील अन्य स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्य पोहोचण्यास सुरुवात झाली. शहरात नोंदणीकृत 248 स्वस्त धान्य दुकाने आहेत. या सर्व दुकानांमध्ये सध्या आनंदाचा शिधा योजनेतील साहित्य पोहोचलेले आहे. तथापि, 45 टक्केच साहित्यांचे आत्तापर्यंत वाटप झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

1 लाख 16 हजार 9 लाभार्थी
गुढीपाडवा (22 मार्च) ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (14 एप्रिल) दरम्यान आनंदाचा शिधा वाटप करण्यात येईल, असे राज्य सरकारने जाहीर केले होते. मात्र, गुढीपाडव्याला या योजनेतील धान्य स्वस्त धान्य दुकानांमध्ये पोहोचले नाही. त्यामुळे गोरगरीबांना गुढीपाडव्याला आनंदाच्या शिधाच मिळाला नाही. तर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीलाही योजनेतील जवळपास 55 टक्के लाभार्थ्यांना साहित्यांचे वाटप झालेले नाही. योजनेमध्येे 1 लाख 16 हजार 9 इतके लाभार्थी आहेत.

अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकाधारकांना या योजनेचा फायदा मिळत आहे. शिधापत्रिकाधारकांना 1 किलो रवा, 1 किलो चनाडाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर पामतेलाचे वाटप केले जात आहे. ई-पॉस मशीनद्वारे 100 रुपये प्रती कीट असा सवलतीच्या दरात हा शिधा दिला जात आहे.

शहरातील सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये आनंदाचा शिधाचे साहित्य पोहोचलेले आहे. आत्तापर्यंत या साहित्याचे 45 टक्के वाटप पूर्ण झाले आहे. योजनेतील लाभार्थ्यांची तक्रार येणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दुकानदारांना दिल्या आहेत. या योजनेला लोकांचा जास्त प्रतिसाद पाहण्यास मिळालेला नाही. तथापि, योजनेतील साहित्याचे वाटप सुरूच राहणार आहे.

     – दिनेश तावरे, परिमंडळ अधिकारी, शिधापत्रिका कार्यालय, निगडी.

Back to top button