अवैध दारू, ताडी विकणार्‍यांवर कारवाई ; 4 लाख 34 हजार 390 रुपयांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

अवैध दारू, ताडी विकणार्‍यांवर कारवाई ; 4 लाख 34 हजार 390 रुपयांचा मुद्देमाल जप्त

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : नारायणगाव येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ‘ड्राय डे’च्या दिवशी बेकायदा दारू व ताडीची विक्री करणार्‍या दोन ठिकाणी छापा टाकून गावठी दारू, ताडी, कार, दुचाकी असा एकूण 4 लाख 34 हजार 390 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. नारायणगाव विभागाचे दुय्यम निरीक्षक सत्यविजय ठेंगडे यांनी ही माहिती दिली. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोघांना ताब्यात घेतले आहे. शिवशंकर किसन महाले (वय 28, रा. धनगरवाडी, ता. जुन्नर), गोरक्ष बाळु कामटे (रा. सविंदणे, ता. शिरूर) अशी त्यांची नावे आहेत. डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त दि. 14 एप्रिल रोजी ड्राय डे असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व अबकारी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात आल्या होत्या.

तरीही नारायणगाव येथे नदीकाठी एक इसम गावठी दारूची व अवैध मद्यविक्री करीत असल्याची माहिती मिळाल्याने तेथे उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला. तेथे वाहनाची (एमएच 03 एझेड 1291) तपासणी केली असता त्यात प्लास्टिक पिशव्यामध्ये भरलेली 70 लिटर गावठी दारू, एक 30 लिटरचा कॅन मिळून आला. वाहनासह 4 लाख 3 हजार 550 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच शिवशंकर महालेला ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, लोणी (ता. आंबेगाव) येथेही कारवाई करण्यात आली. लोणी-बेल्हे रोडवर एकजण दुचाकी (एमएच 12 डीएफ 2305) वरून ताडीची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. सदर इसमाची तपासणी केली असता कापडी पिशवीत ताडी मिळून आली. याप्रकरणी गोरक्ष बाळु कामटे याला ताब्यात घेण्यात आले. तसेच दुचाकी, 42 ताडीचे फुगे असा एकूण 30 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई नारायणगाव विभागाचे दुय्यम निरीक्षक एस. एफ. ठेंगडे, दुय्यम निरीक्षक आर. बी. खाडगीर, जवान विजय विचुरकर, संदीप सुर्वे यांनी केली

Back to top button