मुख्य केंद्राच्या बातम्या आता विविध भारती पुणे एफएमवर | पुढारी

मुख्य केंद्राच्या बातम्या आता विविध भारती पुणे एफएमवर

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  देशभरातील आकाशवाणीच्या मुख्य केंद्रावरून रोज प्रसारित होणार्‍या प्रादेशिक बातम्या आणि राष्ट्रीय बातमीपत्र आता ’विविध भारती पुणे एफएम’वरूनही प्रसारित केले जाणार आहे. शनिवारपासून त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून, आकाशवाणी संचालनालयाकडून यासंदर्भात दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. श्रोत्यांना आता मोबाईलवरील एफएमवर बातम्या ऐकण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. प्रसार भारतीच्या अखत्यारीतील ऑल इंडिया रेडिओच्या कार्यक्रम विभागाचे सहायक संचालक डॉ. संतोष नहार यांनी याबाबत निर्देश दिले आहेत.

त्यानुसार अगरतळा, अहमदाबाद, छत्रपती संभाजीनगर, बेंगळुरू, भोपाळ, भूज, कोलकाता, कुरसुंग, लेह, लखनऊ, मुंबई, पुणे अशा देशभरातील 45 आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित होणार्‍या प्रादेशिक बातम्यांचे प्रसारण विविध भारती एफएमवरूनही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आकाशवाणी पुणे केंद्रावरून दररोज सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी प्रादेशिक बातम्यांचे प्रसारण केले जाते. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता दहा मिनिटे कालावधीचे राष्ट्रीय बातमीपत्र प्रक्षेपित केले जाते. त्याप्रमाणे सायंकाळी पाच वाजून 55 मिनिटांनी पाच मिनिटे कालावधीच्या बातम्यांचे प्रसारण केले जाते. या सर्व बातम्या ऐकणार्‍या श्रोत्यांची संख्या मोठी असून, त्यात आता श्रोत्यांना विविध भारती पुणे एफएमवर बातम्या मोबाईलवर ऐकणे शक्य झाले आहे.

आकाशवाणी संचालनालयाचे महासंचालकांकडून आलेल्या निर्देशानुसार आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणार्‍या प्रादेशिक बातम्या आणि राष्ट्रीय बातमीपत्र आता विविध भारती पुणे एफएमवरही ऐकायला मिळणार असून, त्याची कार्यवाही शनिवारपासून करण्यात आली आहे, अशी माहिती आकाशवाणी पुणे केंद्राचे संचालक इंद्रजित बागल यांनी दिली.

Back to top button