[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]
पुणे, पुढारी वृत्तसेवा: देशात नव्या सहकार धोरणासाठी नियुक्त केलेल्या माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल लवकरच मिळण्याची अपेक्षा आहे. तो प्राप्त होताच सहकार धोरणावरील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी.एल. वर्मा यांनी येथे दिली. भारताची अर्थव्यवस्था लवकरच पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत झेप घेण्याची अपेक्षा असून त्यामध्ये सहकार क्षेत्राचे महत्वपूर्ण योगदान राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेच्या (वैमनिकॉम) 55 आणि 56 व्या तुकडीच्या पदवी प्रदान समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते एकूण 118 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय सहकार सह सचिव आलोक अग्रवाल, वैमनिकॉमचे संचालक डॉ. हेमा यादव, डॉ. डी रवी, एस. वाय. देशपांडे यांच्यासह कार्यक्रमास रिझर्व्ह बँकेचे संचालक सतिश मराठे, राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
देशात सहकार विद्यापीठाची स्थापनाही केली जाणार असून ते कोठे करायचा यावरील निर्णय अद्याप झालेला नसल्याचे नमूद करुन वर्मा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्याने सहकार मंत्रालयाची स्थापना केली असून सहकार मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्रासाठी चांगले आणि सशक्त निर्णय घेतले जात आहेत. देशात नव्याने दोन लाख विकास सोसायट्यांची (पॅक्स) उभारणी करण्यात येत आहे. पॅक्सशिवाय डेअरी, मत्स्य सोसायट्यांची संख्या वाढविली जाईल. प्रत्येक गावात अन्नधान्यांच्या साठवणुकीसाठी गोदामांची संख्या वाढविण्यात येत आहे.
विकास सोसायट्यांच्या संगणकीकरणाची योजना कार्यान्वित झाली असून पारदर्शक कारभारास मदत होणार आहे. सोसायट्यांना पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, नागरी सुविधा केंद्रेसुध्दा देण्यात येणार असून त्यांचे उत्पन्नवाढीस प्राधान्य देण्यात येत आहे. वैमनिकॉम संस्थेचे सहकार क्षेत्रासाठी चांगले काम असून ग्रामीण भागाचा विकास करणारे उद्योजक या संस्थेतून निर्माण होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
केंद्रिय सहकार सह सचिव आलोक अग्रवाल म्हणाले, वैमनिकॉम संस्था ही सहकारात अग्रगण्य असून सहकार क्षेत्र वाढीत चांगली भुमिका बजावत आहे. सहकार शिक्षण-प्रशिक्षणातही या संस्थेचा मोलाचा वाटा आहे. शिवाय शिक्षणानंतर शंभर टक्के नोकरी मिळत असल्यानेही विद्यार्थ्यांना फायदा होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नोकरी करताना, जेथे काम कराल तेथे चांगला बदल घडवून आणावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. वैमनिकॉमच्या संचालक डॉ. हेमा यादव यांनी स्वागत व प्रास्तविक तर निबंधक व्ही. सुधीर यांनी आभार प्रदर्शन केले.
[web_stories title="true" excerpt="true" author="false" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="5" order="DESC" orderby="post_date" view="list" /]