सरपंचांनी विकासाला प्राधान्य द्यावे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन | पुढारी

सरपंचांनी विकासाला प्राधान्य द्यावे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

शिरूर : पुढारी वृत्तसेवा : गावात पिण्याचे शुद्ध पाणी, घर तिथे वीज, घर तिथे टॉयलेट असणे गरजेचे आहे. त्यासाठी लागेल तेवढा निधी देणार आहे. राजकारण फक्त निवडणुकीपुरते असून, निवडणुकांनंतर सर्वांनी एकत्र येऊन गावाचा विकास करावा, असा सल्ला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरपंचांना दिला. शिरूर पंचायत समिती सभागृह येथे पालकमंत्री पाटील यांच्या वतीने तालुक्यातील ’सरपंच संवाद सभा’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन केले, त्या वेळी पाटील बोलत होते. आमदार अशोक पवार, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, गटविकास अधिकारी अजित देसाई, भाजप जिल्हा सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, जयश्री पलांडे आदींसह विविध गावांचे सरपंच उपस्थित होते.

सरपंचांनी शासनाच्या विविध योजनांतून निधी आणून गावाचा विकास करावा. शिरूर तालुक्यातील गावांमध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी असणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणार्‍या प्रोजेक्टसाठी निधी उपलब्ध करून देणार आहे. महिला मुलींसाठी स्वतंत्र टॉयलेट व चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी निधीची कमतरता पडणार नाही. त्यासाठी सरपंचांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. रस्त्यांचे प्रश्न सोडवले जातील. आपल्या हद्दीतील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमधून सीएसआर फंड मिळवण्यासाठी प्रयत्न करा. अडचणी असतील तिथे पालकमंत्री म्हणून कंपनीशी मी स्वतः बोलून निधी उपलब्ध करून देईन, असे आश्वासनही दिले. कामांसाठी व्हाट्स अ‍ॅपवर निवेदन पाठवले तरी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन त्यांनी सांगितले.

शिरूर तालुक्यात विविध समाजांसाठी स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावावा, दहा हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असणार्‍या गावांना नगरपरिषदेचा दर्जा द्यावा, शालेय पोषण आहार मिळवण्यासाठी सेंट्रलाईज किचन योजना सुरू करावी आदी मागण्या आमदार अशोक पवार यांनी पालकमंत्र्यांकडे केल्या. सरपंच समीक्षा फराटे, संभाजी बेनके, हिवरेच्या सरपंच शारदा गायकवाड, वडगाव रासाई सरपंच सचिन शेलार, करंदीच्या सरपंच सोनाली ढोकले आदींसह विविध गावांचे सरपंच उपस्थित होते.

Back to top button