परिस्थितीशी झगडत बहीण-भाऊ एकाच वेळी पोलिसात भरती | पुढारी

परिस्थितीशी झगडत बहीण-भाऊ एकाच वेळी पोलिसात भरती

तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा : शिक्रापूर येथील एका बहीण-भावाच्या जोडीने परिस्थितीशी दोनहात करीत एकाच वेळी पोलिसात भरती होत खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण केले आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथे व्यवसायानिमित्त वास्तव्यास आलेले नारायण सोळंके व गंगा सोळंके हे मूळचे जालना जिल्ह्यातील सावरगाव बुद्रुकचे, हलाखीची परिस्थिती असलेले कुटुंब. त्यांना लक्ष्मण, विजय व राधा ही तीन मुले आहेत. सुरुवातीपासून मुलांना शिक्षण देण्यासाठी दोघांनी खूप कष्ट केले. वडील नारायण हे चहाचा गाडा चालवून, तर आई गंगा ह्या शेतात काम करून कुटुंब चालवत. मुले मोठी झाल्यावर शिक्षणासह काही कामधंदा करू लागली. लक्ष्मण दुचाकी दुरुस्तीचे, तर विजय कंपनीत काम करू लागला.

मात्र, दुचाकी दुरुस्तीचे काम करीत असताना लक्ष्मण मन लावून अभ्यास करीत असल्याचे पाहून अनेकांनी त्याची थट्टा केली. काहीही झाले तर आपण पोलिस दलात जायचेच, हे लक्ष्मणने ठरविले; तर राधा महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपल्या भावाचीच पुस्तके वापरून आपण देखील पोलिस व्हावे, असे तिला वाटू लागले. त्यामुळे राधानेही अभ्यास सुरू केला.

लक्ष्मणने 2021 मध्ये पोलिस भरतीची परीक्षा दिली. मात्र, त्याला अपयश आले. परंतु, त्याने जिद्द सोडली नाही. सध्या लक्ष्मण व त्याची लहान बहीण राधा दोघांनी देखील लोणीकंद येथील डिफेन्स करिअर अकादमीमध्ये पोलिस भरतीचा सराव केला आणि नुकत्याच पार पडलेल्या परीक्षेला मन लावून अभ्यास करून ते सामोरे गेले. सध्या जाहीर झालेल्या पोलिस भरतीमध्ये लक्ष्मण सोळंके व राधा सोळंके या दोघा बहीण-भावाने यश संपादित करून आपल्यासह आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार करीत थट्टा उडविणार्‍यांच्या डोळ्यांत अंजन घातले आहे.

Back to top button